मुंबई : येत्या काही महिन्यांत भारतीय भांडवली बाजारांत बहारदार तेजीची शक्यता असून, वर्षअखेर अर्थात डिसेंबर २०२५ पर्यंत निफ्टी निर्देशांक २८,९५७ चा नवीन उच्चांक गाठेल अशी अपेक्षा आहे, असे पीएल कॅपिटलने गुरुवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालाचा आशावाद आहे.निफ्टी निर्देशांकाने यापूर्वी सप्टेंबर २०२४ मध्ये २६,२७७.३५ हा सार्वकालिक उच्चांक गाठला होता. बाजाराच्या सद्य:स्थितीनुसार, निफ्टीच्या आगामी वाटचालीसाठी तीन शक्यता अहवालात मांडण्यात आल्या आहेत. सामान्य स्थितीतून पाहिल्यास, निफ्टीचे मूल्यांकन हे त्याच्या १५ वर्षांच्या सरासरी १८.५ पट या किंमत-उत्पन्न (पी/ई) गुणोत्तराच्या तुलनेत जवळपास २.५ टक्के आजही खाली आहे आणि मार्च २०२७ मध्ये निफ्टीची प्रति समभाग मिळकत (ईपीएस) १,४५१.५ रुपये असण्याचा अंदाज आहे. यामुळे तिचे लक्ष्य २५,५२१ या आधीच्या अंदाजापेक्षा सुधारित म्हणजेच २६,८८९ वर राहू शकते.
तेजीच्या अंगाने पाहिल्यास, निफ्टी निर्देशांकाचे मूल्यांकनाने २० पट पी/ई गुणोत्तराला गाठल्यास, त्याचे २८,९५७ चे लक्ष्य दिसून येते. त्या उलट
मंदीच्या अंगाने पाहिल्यास, निफ्टीचे मूल्यांकन त्याच्या दीर्घकालीन सरासरीपेक्षा १० टक्के सूट राखून व्यापार करू शकते, ज्यातून त्याचे लक्ष्य हे २४,८२१ असे असेल, जे पूर्वअंदाजित २४,८३१ पेक्षा थोडे कमी आहे. तथापि निफ्टीचे मूल्यांकन २० पट पी/ईवर जाण्याची शक्यता अधिक असून, आणि ते २८,९५७ च्या तेजीच्या लक्ष्यापर्यंत पोहोचेल, असेही अहवालाने नमूद केले आहे.
तेजीला आधार देणाऱ्या घटकांमध्ये सामान्य मान्सून, खाद्यान्न महागाईने गाठलेला अनेक वर्षांचा तळ, रिझर्व्ह बँकेची व्याजदर आणि सीआरआर कपात आणि केंद्रीय अर्थसंकल्पातील कर लाभ यांचा समावेश अहवालाने केला आहे. तथापि, भविष्यात ग्राहक मागणीत पुनरुज्जीवन होणे महत्त्वाचे असेल. आगामी सणासुदीचा हंगाम आणि हंगामी पावसाचे सुयोग्य वितरण हे बाजारातील मागणी वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल अशी अपेक्षा आहे. सर्व घटकांमध्ये परिस्थिती अनुकूल राहिली तर निफ्टी निर्देशांक नवीन उच्चांक गाठण्याचा प्रवास सुरू ठेवेल, असे अहवालाने नमूद केले आहे.