वृत्तसंस्था, नवी दिल्ली

अदानी सिमेंट इंडस्ट्रीजने मागील आठवड्यात २० कोटी डॉलरच्या कर्जाची मुदतपूर्व परतफेड केली आहे. यामुळे होल्सीम लिमिटेडच्या भारतातील व्यवसायाची खरेदी करण्यासाठी अदानी सिमेंटने जागतिक बँकांकडून घेतलेल्या १ अब्ज डॉलरच्या कर्जाचा बोजा काही प्रमाणात कमी झाला आहे.

कर्जाची मुदतपूर्व परतफेड करण्यात आल्यामुळे अब्जाधीश उद्योगपती गौतम अदानी यांच्या मालकीच्या अदानी सिमेंट इंडस्ट्रीजला कर्जफेडीसाठी तीन वर्षांची मुदतवाढ मिळवता येऊ शकते. होल्सीम लिमिटेडचा भारतातील व्यवसाय खरेदी करण्यासाठी जागतिक बँकांनी अदानी समूहाला ४.५ अब्ज डॉलरचे कर्ज दिले आहे. या कर्जाच्या परतफेडीची मुदत सप्टेंबर २०२४ आहे.

आणखी वाचा-गोदरेज कंझ्युमरकडून २,८२५ कोटींना रेमंडच्या ग्राहक सेवा व्यवसायाचे अधिग्रहण

अदानी समूहाने सप्टेंबर २०२२ मध्ये अंबुजा सिमेंट आणि तिची उपकंपनी एसीसी लिमिटेड यांची स्वित्झ्रर्लंडच्या होल्सीम ग्रुपकडून ६.४ अब्ज डॉलरला खरेदी केली. या कंपन्यांच्या खरेदीमुळे अदानी समूह भारतीय बाजारपेठेतील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा सिमेंट उत्पादक बनला. पहिल्या स्थानी आदित्य बिर्ला समूहाची अल्ट्राटेक सिमेंट कंपनी आहे.

कर्जफेडीवर अदानी समूहाचा भर

अदानी समूहातील कंपन्यांमध्ये गैरप्रकार झाल्याचा दावा करणारा हिंडेनबर्ग रिसर्चचा अहवाल जानेवारी महिन्यात समोर आला होता. त्यामुळे भांडवली बाजारात अदानी समूहातील कंपन्यांचे समभाग गडगडले होते. अदानी समूहातील कंपन्यांवर क्षमतेपेक्षा जास्त कर्ज असल्याचा ठपका अहवालात ठेवण्यात आला होता. तेव्हापासून अदानी समूहाने मुदतपूर्व कर्ज परतफेड सुरू केली असून, २ अब्ज डॉलरच्या समभाग तारण कर्जाची परतफेड केली आहे.

Story img Loader