मुंबई : आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या एप्रिल-जून या पहिल्या तिमाहीत म्युच्युअल फंडांमध्ये १,८४,७८९ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली, जी गेल्या चार वर्षांतील सर्वोत्तम तिमाही गुंतवणूक आहे. यामध्ये निश्चित-उत्पन्न श्रेणीतील फंडांचा सिंहाचा वाटा राहिला.
‘मॉर्निंगस्टार इंडिया’च्या ताज्या अहवालानुसार, जून तिमाहीत ओपन-एंडेड फंडामध्ये मोठ्या प्रमाणावर निधी ओघ राहिला. एप्रिलमध्ये १,२३,६१३ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. मे महिन्यात ५९,८७९ कोटींपर्यंत खाली आली आणि तर जून महिना निराशाजनक राहिला असून त्या महिन्यात केवळ १,२९५ कोटींची नक्त आवक आली. म्हणजेच तीन महिन्यांतील एकत्रित गुंतवणूक १,८४,७८९ कोटी रुपयांची राहिली.
अहवालानुसार, गेल्या नऊ तिमाहींमध्ये इक्विटी फंडांमध्ये निव्वळ प्रवाह सकारात्मक असून, गेल्या काही तिमाहींपासून त्याची गती मात्र कमी होत आहे. जून तिमाहीत, निव्वळ प्रवाह लक्षणीय प्रमाणात घसरून १८,३५८ कोटींवर आला, जो मागील तिमाहीत ४८,७६६ कोटी रुपये होता. जून २०२३ अखेर संपलेल्या तिमाहीत १६ पैकी फक्त चार निश्चित-उत्पन्न श्रेणींमधून गुंतवणूक काढून घेण्यात आली. लिक्विड फंड श्रेणीमध्ये ७९,९०८ कोटी आणि मनी मार्केट फंडांच्या श्रेणीमध्ये २९,५१९ कोटी रुपयांचा निव्वळ प्रवाह दिसून आला.
म्युच्युअल फंड घराण्यांकडील मालमत्ता ४४.१३ लाख कोटींवर
जूनअखेरीस म्युच्युअल फंड घराण्यांच्या व्यवस्थापनाखालील एकूण मालमत्ता ४४.१३ लाख कोटी रुपये होती, जी मागील तिमाहीच्या तुलनेत १३ टक्क्यांनी अधिक आहे. तर जूनपर्यंत इक्विटी फंडांच्या व्यवस्थापनाखालील एकूण मालमत्ता १७.४४ लाख कोटी रुपये होती, जी मागील वर्षातील याच तिमाहीच्या तुलनेत १५ टक्क्यांनी वधारली आहे.