रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी रेपो दरात केलेल्या अपेक्षेपेक्षा जास्त अशा अर्धा टक्क्यांच्या कपातीची ताबडतोब परिणाम दिसून येत असून, अनेक बँकांनी रविवारपासून व्याजाचे दर तेवढ्याच प्रमाणांत म्हणजे अर्धा टक्क्यांनी कमी करण्याची घोषणा केली. सरकारी मालकीच्या बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक यांनी रविवारी रिझर्व्ह बँकेच्या दर कपातीला अनुसरून, तिचे रेपो दराशी संलग्न कर्जदर (आरएलएलआर) ५० आधार बिंदूनी अर्थात अर्धा टक्क्यांनी कमी करण्याची घोषणा केली. त्यांचे या प्रकारातील व्याजाचे दर हे आता अनुक्रमे ८.१५ टक्के आणि ८.३५ टक्के पातळीवर आले आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ इंडियानेही तत्सम कपात करून, ८.८५ टक्क्यांऐवजी आता ८.३५ टक्के असे सुधारीत व्याजदर रेपो दर संलग्न कर्जांसाठी लागू केले आहेत.

खासगी क्षेत्रातील एचडीएफसी बँकेने त्यांच्या निधी आधारीत कर्जाचे दरात (एमसीएलआर) कालावधीनुरूप १० आधार बिंदूंची (०.१० टक्के) कपात केली आहे. ज्यांचे कर्ज या मानदंडाशी संलग्न आहेत, अशा कर्जदारांना याचा फायदा होईल. बँकेचे हे नवीन दर ७ जूनपासूनच लागू झाल्याचे म्हटले आहे. युको बँकेनेही ‘एमसीएलआर’ संलग्न व्याजाचे दर १० आधारबिंदूंनी कमी केले आहेत. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी व्याजदरात कपातीसह, रिझर्व्ह बँकेकडून अनपेक्षितपणे बँकांना कर्ज देण्यासाठी अधिक पैसे उपलब्ध करून देणारे रोख राखीव प्रमाण (सीआरआर) देखील एक टक्क्यांनी कमी करण्याच्या निर्णयाची घोषणा केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

टप्प्याटप्प्याने लागू होणाऱ्या या कपातीने बँकांसाठी सीआरआरचे प्रमाण हे ४ टक्क्यांवरून ३ टक्क्यांवर येईल आणि तब्बल २.५० लाख कोटी रुपयांचा निधी बँकांना कर्जवितरणासाठी खुला होईल, असे रिझर्व्ह बँक गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी शुक्रवारी स्पष्ट केले.