बेंगळूरु : विद्युत दुचाकींची निर्मिती करणाऱ्या आघाडीच्या एथर एनर्जीने शनिवारी बंगळूरुमध्ये संपूर्ण कुटुंबासाठी स्कूटर या संकल्पनेवर आधारित रिझ्टा ही इलेक्ट्रिक अर्थात विद्युत शक्तीवर चालणारी दुचाकी सादर केली. रिझ्टा ही वाहन चालवणाऱ्या व्यक्तीच्या आराम, सुविधा आणि सुरक्षिततेला प्राधान्य देते, त्यासाठी या दुचाकीच्या डॅशबोर्डवर स्किड कंट्रोल आणि व्हॉट्सॲपसारख्या वैशिष्ट्यांचा समावेश करण्यात आला आहे.

ही विद्युत दुचाकी मुख्य पाच रंगांत उपलब्ध असून रिझ्टा एस आणि रिझ्टा जी अशा दोन श्रेणींमध्ये बाजारात दाखल होणार आहे. येत्या जुलै महिन्यापासून ही वाहने बाजारात उपलब्ध होतील. त्यासाठी ग्राहक ९९९ रुपयांमध्ये आगाऊ नोंदणी करू शकतील. रिझ्टा एसची किंमत सुमारे १.०९ लाख रुपये आहे, तर रिझ्टा जीमध्ये दोन प्रकारांत वाहन उपलब्ध असून त्याची किंमत अनुक्रमे १.२५ लाख रुपये आणि १.४५ लाख रुपये असेल.

हेही वाचा >>>‘सेन्सेक्स’ची ऐतिहासिक ७५ हजारांच्या शिखरावरून माघार

भारतीय कुटुंबांची गरज आणि आवड लक्षात घेऊन ही दुचाकी बनविण्यात आली आहे. यामध्ये सामान ठेवण्याची क्षमता इतर कोणत्याही दुचाकींच्या तुलनेत अधिक आहे, शिवाय आसनाखाली बहुउद्देशीय चार्जरदेखील उपलब्ध केला असून, ज्या माध्यमातून फोन, टॅबलेट, पोर्टेबल स्पीकर आणि यासारखी इलेक्ट्रॉनिक उपकरणे चार्ज करता येतील, असे एथर एनर्जीचे सह-संस्थापक आणि मुख्याधिकारी तरुण मेहता म्हणाले.

‘हॅलो’ स्मार्ट हेल्मेट

रिझ्टा वाहनासह कंपनीने हॅलो नाममुद्रेअंतर्गत दोन प्रकारचे हेल्मेट स्मार्ट सादर केले आहेत, जी स्पीकर आणि ब्लूटूथ जोडणीने सुसज्ज आहेत. यामुळे वाहन चालवताना पसंतीचे संगीत ऐकता येण्यासह, चालकाला मागील आसनावर बसलेल्या व्यक्तीशीदेखील सहज संवाद साधता येणार आहे. हेल्मेटची किंमत अनुक्रमे ४,९९९ रुपये आणि १२,९९९ रुपये निश्चित करण्यात आली आहे.