मुंबई: एकीकडे डॉलरच्या तुलनेत रुपयाने गुरुवारी ऐतिहासिक नीचांकी तळ गाठला, तर दुसरीकडे सोन्याच्या दराने सर्व उच्चांक मोडीत काढत नवीन विक्रमी शिखर गाठले. राजधानी दिल्लीत गुरुवारी सोन्याच्या किमती १,१३,१०० रुपये प्रति १० ग्रॅम या नवीन उच्चांकी पातळीवर पोहोचल्या.
भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार ताणामुळे डॉलरच्या तुलनेत रुपयाने ८८.४७ हा सार्वकालिक नीचांकी तळ गाठला. अमेरिकेच्या महागाई दराशीसंबंधित आगामी आकडेवारी आणि परकीय निधीच्या बहिर्गमनामुळे अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाला अधिक झळ बसली, असे चलन व्यापाऱ्यांनी सांगितले. गेल्या काही सत्रांमध्ये खनिज तेलाच्या किमतीही वाढल्याने रुपयाच्या मूल्यावर आणखी ताण निर्माण झाला आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत-अमेरिका व्यापार कराराबद्दल सकारात्मक संकेत दिल्यानंतर रुपया किंचित सावरला होता. मात्र डॉलरची वाढती मागणी आणि जागतिक प्रतिकूल घटकांमुळे रुपयात आणखी घसरण होण्याची शक्यता आहे.
देशांतर्गत आघाडीवर रुपयाने ८८.११ पातळीवरून व्यवहाराला सुरुवात केली आणि दिवसअखेर ३६ पैशांनी घसरून ८८.४७ या विक्रमी नीचांकी पातळीवर तो स्थिरावला. बुधवारी, रुपया त्याच्या विक्रमी नीचांकी पातळीपासून किंचित सावरला होता. डॉलरच्या तुलनेत ४ पैशांनी वधारून तो ८८.११ पातळीवर बंद झाला होता. याआधी ५ सप्टेंबर रोजी, रुपयाने ८८.३८ या नीचांकी पातळीला स्पर्श केला होता. तर २ सप्टेंबरला त्याने ८८.१५ ही नीचांकी पातळी नोंदवली होती.
शुक्रवारच्या सत्रात रुपया ८८.२५ ते ८८.७५ च्या श्रेणीत राहण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, सहा चलनांच्या तुलनेत डॉलरच्या ताकदीचे मूल्यांकन करणारा डॉलर निर्देशांक ०.२२ टक्क्यांनी वाढून ९७.९९ वर पोहोचला आहे, असे निरीक्षण फिनरेक्स ट्रेझरी अॅडव्हायझर्स एलएलपीचे ट्रेझरी प्रमुख आणि कार्यकारी संचालक अनिल कुमार भन्साळी यांनी नोंदवले.
अमेरिकन डॉलर निर्देशांकात सुधारणा आणि सततचा परदेशी गुंतवणूकदारांकडून समभाग विक्रीचा मारा यामुळे रुपया आगामी काळात नकारात्मक दिशेने व्यवहार करेल अशी अपेक्षा आहे. आयातदारांकडून डॉलरची वाढती मागणी आणि भारत-अमेरिका यांच्यातील चालू असलेल्या व्यापार युद्धामुळे रुपयावर आणखी दबाव येऊ शकतो, असे मिरे ॲसेट शेअरखानचे चलन आणि कमोडिटीजचे संशोधन विश्लेषक अनुज चौधरी म्हणाले.
सोने उच्चांकी
सोन्यात सुरू असलेल्या सततच्या खरेदीमुळे गुरुवारी त्यात १०० रुपयांची वाढ झाली आहे, असे ऑल इंडिया सराफा असोसिएशनने स्पष्ट केले. चालू वर्षात सोन्याच्या किमती प्रति १० ग्रॅमसाठी ३४,१५० रुपयांनी म्हणजेच सुमारे ४३.२५ टक्क्यांनी वाढल्या आहेत. मौल्यवान धातूने १०० रुपयांनी वाढ नोंदवून १,१२,६०० रुपये प्रति १० ग्रॅम (सर्व कर समाविष्ट) या नवीन विक्रमी उच्चांकी पातळीला आता गाठले आहे.