मुंबई: रिझर्व्ह बँकेने व्याजदरात कपात केल्याने बँकांनीही व्याजदर कपात सुरू केली असून, देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँकेने व्याजदरात सोमवारी अर्धा टक्का कपात जाहीर केली. या कपातीचा फायदा बँकेच्या विद्यमान ग्राहकांसह नवीन ग्राहकांनाही होणार आहे. दरम्यान, बँकेने मुदत ठेवींवर देय व्याजदरात देखील पाव टक्का कपात केली आहे.

स्टेट बँकेने रेपो दराशी संलग्न कर्ज दरात (आरएलएलआर) अर्धा टक्का कपात करून तो ७.७५ टक्क्यांवर आणला आहे. याचबरोबर बाह्य मानदंडावर आधारित कर्ज दर ८.६५ टक्क्यांवरून ८.१५ टक्क्यांवर आणला आहे. हे सुधारित व्याजदर १५ जूनपासून लागू करण्यात आले आहेत. बँकेने सर्व प्रकारच्या मुदत ठेवींवरील व्याजदरात पाव टक्का कपात केली आहे. ही कपात ३ कोटी रुपयांपर्यंतच्या मुदत ठेवींसाठी आहे.

आता बँकेकडून १ ते २ वर्षे मुदतीच्या ठेवींवर ६.५० टक्के व्याजदर आणि २ ते ३ वर्षे मुदतीच्या ठेवींवर ६.४५ टक्के व्याजदर दिला जाईल. याचबरोबर ३ ते ५ वर्षे मुदतीच्या ठेवींवर ६.३० टक्के आणि ५ ते १० वर्षे मुदतीच्या ठेवींवर ६.०५ टक्के व्याजदर असेल, अशी माहिती बँकेने संकेतस्थळावर दिली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रिझर्व्ह बँकेने गेल्या आठवड्यात पतधोरणात व्याजदरात अर्धा टक्का कपात केली होती. त्यामुळे रेपो दर ५.५ टक्क्यांच्या चार वर्षांतील नीचांकी पातळीवर आले आहेत. यानंतर बँकांकडून व्याजदर कपातीचे पाऊल उचलण्यात येत आहे. या आधी खासगी क्षेत्रातील एचडीएफसी आणि आयसीआयसीआय या बड्या बँकासह, अनेक सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी कर्ज दरांसह मुदत ठेवी आणि बचत खात्यावरील व्याजदरातही कपात केली आहे. यामुळे कर्जे स्वस्त होणार असली तरी मुदत ठेवींतील गुंतवणूक आणि बचतीवर मिळणाऱ्या लाभाला कात्री लागणार आहे.