मुंबई : आघाडीचे म्युच्युअल फंड घराणे असलेल्या एसबीआय म्युच्युअल फंडने प्रारंभिक समभाग पूर्व फेरीमध्ये (प्री-आयपीओ) लेन्सकार्ट सोल्युशन्समध्ये १०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

या व्यवहाराचा एक भाग म्हणून, प्रवर्तकांपैकी एक असलेल्या नेहा बन्सल यांनी एसबीआय ऑप्टिमल इक्विटी फंड (एआयएफ) आणि एसबीआय इमर्जंट फंड एआयएफला ४०२ रुपये प्रति समभागाप्रमाणे २४.८७ लाख समभाग हस्तांतरित केले आहेत, अशी माहिती लेन्सकार्टने बुधवारी दिली. या व्यवहारानंतर, लेन्सकार्टमधील बन्सल यांचा हिस्सा ७.६१ टक्क्यांवरून ७.४६ टक्क्यांपर्यंत कमी होणार आहे.

गेल्या आठवड्यात, अव्हेन्यू सुपरमार्ट्सचे (डीमार्ट) संस्थापक राधाकिशन दमानी यांनी प्री-आयपीओ व्यवहाराद्वारे लेन्सकार्टमध्ये सुमारे ९० कोटी रुपयांची गुंतवणूक केली. दमानी यांनी संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पियुष बन्सल यांची बहीण नेहल बन्सल यांच्याकडून समभाग खरेदी केले आहेत. ही समभाग विक्री आयपीओच्या आंशिक समभाग विक्रीचा (ओएफएस) भाग नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

लेन्सकार्ट आयपीओच्या माध्यमातून ७,२७८ कोटी रुपयांची निधी उभारणी करणार आहे. आयपीओ ३१ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबरदरम्यान खुला असेल. कंपनीने यासाठी प्रतिसमभाग ३८२ ते ४०२ रुपयांचा किंमतपट्टा निश्चित केला आहे. यासाठी किमान ३७ समाभागांसाठी अर्ज करावा लागेल.

लेन्सकार्ट आयपीओच्या माध्यमातून २,१५० कोटी रुपये मूल्याच्या नवीन समभागांची विक्री करणार आहे. प्रवर्तक आणि प्रवर्तक गटाकडील १२.७५ कोटी समभाग आंशिक समभाग विक्रीच्या (ओएफएस) माध्यमातून उपलब्ध करण्यात आले आहेत. ओएफएसचा एक भाग म्हणून, प्रवर्तक पियुष बन्सल, नेहा बन्सल, अमित चौधरी आणि सुमीत कपाही; आणि गुंतवणूकदार – एसव्हीएफ II लाईटबल्ब (केमन) लिमिटेड, स्क्रोडर्स कॅपिटल प्रायव्हेट इक्विटी एशिया मॉरिशस लिमिटेड, पीआय अपॉर्च्युनिटीज फंड – II, मॅक्रिची इन्व्हेस्टमेंट्स प्रा. लि. लिमिटेड, केदारा कॅपिटल फंड II एलएलपी आणि अल्फा वेव्ह व्हेंचर्स एलपी हे समभागांची विक्री करतील.

लेन्सकार्ट आयपीओमधून मिळणारे उत्पन्न विविध धोरणात्मक उपक्रमांसाठी वापरणार आहे, ज्यामध्ये भारतात नवीन दालने सुरू करणे, यात स्व मालकीचे कोको स्टोअर्स स्थापन उघडणे यांचा समावेश आहे. तसेच कोको स्टोअर्ससाठी भाडेपट्टा, भाडे आणि परवाना करारांशी संबंधित देयके; तंत्रज्ञान आणि क्लाउड पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक; ब्रँड जागरूकता वाढविण्यासाठी हा निधी खर्च करण्यात येईल. भारतातील सर्वात मोठी चष्मा, सनग्लासेस आणि कॉन्टॅक्ट लेन्स बनवणारी कंपनी आहे.