मुंबई : भांडवली बाजार नियामक सेबीने एचडीएफसी बँकेची उपकंपनी एचडीबी फायनान्शियल सर्व्हिसेस आणि विक्रम सोलरसह चार कंपन्यांना प्रारंभिक समभाग विक्रीच्या माध्यमातून निधी उभारणीला परवानगी दिली आहे, असे सेबीने मंगळवारी सांगितले.
सेबीची परवानगी मिळालेल्या इतर कंपन्यांमध्ये ए-वन स्टील्स इंडिया, शांती गोल्ड इंटरनॅशनल, डॉर्फ-केटल केमिकल्स आणि श्रीजी शिपिंग ग्लोबल लिमिटेड यांचा समावेश आहे. या सहा कंपन्यांनी एकत्रितपणे प्रारंभिक समभाग विक्रीद्वारे २०,००० कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी उभारण्याचा प्रस्ताव आहे.
ऑक्टोबर २०२४ ते २५ जानेवारी २०२५ दरम्यान सेबीकडे आयपीओसाठी मसुदा प्रस्ताव दाखल करणाऱ्या या सहा कंपन्यांनी २७-३० मे दरम्यान त्यांचे निरीक्षण नोंदवले आहे. सेबीच्या भाषेत, निरीक्षणे मिळवणे म्हणजे सार्वजनिक समभाग विक्रीसाठी पुढे जाणे.
एचडीबी फायनान्शियल सर्व्हिसेसच्या बाबतीत, त्यांचा प्रस्तावित आयपीओ अंतर्गत २,५०० कोटी रुपये मूल्याच्या नवीन समभागांची विक्री करणार आहे. तर मुख्य प्रवर्तक कंपनी एचडीएफसी बँकेकडील १०,००० कोटी रुपये मूल्याच्या समभागांची विक्री आंशिक समभाग विक्री अर्थात ओएफएसच्या माध्यमातून उभारणार आहे. सध्या, एचडीएफसी बँकेची एचडीबी फायनान्शियल सर्व्हिसेस या बॅंकेतर वित्त कंपनीमध्ये ९४.३६ टक्के हिस्सेदारी आहे. तसेच विक्रम सोलरचा आयपीओच्या माध्यमातून १,५०० कोटी रुपयांचा निधी उभारणार आहे. यामध्ये नवीन समभाग, प्रर्वतक आणि प्रवर्तक गटाकडील १.७४ कोटी समभाग विक्री करण्यात येईल. या सहा कंपन्यांचे समभाग मुंबई शेअर बाजार (बीएसई) आणि राष्ट्रीय शेअर बाजारात (एनएसई) सूचिबद्ध करण्याचा प्रस्ताव आहे.