नवी दिल्ली : भांडवली बाजार नियामक ‘सेबी’ने गुंतवणूकदारांना डीमॅट आणि म्युच्युअल फंड नामनिर्देशनासाठी (नॉमिनी) पुढील वर्षी ३० जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे. याआधी गुंतवणूकदारांना नामनिर्देशनासाठी ३१ डिसेंबर २०२३ ही अंतिम मुदत देण्यात आली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वारसदाराचे नामनिर्देशन हा गुंतवणुकीतील महत्त्वाचा घटक असतो. ही बाब लक्षात घेऊन ‘सेबी’ने सुरुवातीला नामनिर्देशन करण्याची अंतिम मुदत ३१ मार्च २०२३ ठरविली होती, ती पुढे ३० सप्टेंबर २०२३ आणि नंतर ती ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत वाढवण्यात आली. आता ती चौथ्यांदा आणखी सहा महिन्यांनी वाढवली गेली आहे.

हेही वाचा >>> अर्थमंत्र्यांची बँकप्रमुखांसोबत येत्या शनिवारी बैठक

‘सेबी’ने १ ऑगस्ट २०२२ पासून म्युच्युअल फंडात केलेल्या सर्व नवीन गुंतवणुकीसाठी नामांकन अनिवार्य केले आहे. मात्र त्याआधीपासून गुंतवणूक सुरू असणाऱ्यांना नामनिर्देशन करण्यासाठी किंवा त्यात बदल अथवा केलेले नामनिर्देशन रद्द करण्याची योग्य सुविधा उपलब्ध करण्याचे फंड घराण्यांना ‘सेबी’कडून सांगण्यात आले आहे. गुंतवणूकदारांना ऑनलाइन माध्यमातून अथवा ऑफलाइन म्हणजेच भौतिक माध्यमातून अर्ज सादर करण्याची सुविधा देण्यास फंड घराण्यांना सांगण्यात आले आहे.

म्युच्युअल फंडातील नामनिर्देशन म्हणजे काय?

नामनिर्देशन म्हणजे अशी प्रक्रिया असते ज्यात तुमचा मृत्यू झाल्यास अशा प्रसंगी तुमच्या मालमत्तेची काळजी घेण्यासाठी नामनिर्देशित व्यक्तीची नियुक्ती करण्याची सुविधा आहे. तुम्ही तुमच्या म्युच्युअल फंड योजनेसाठी नामनिर्देशित व्यक्तीची नेमणूक करू शकता. नामनिर्देशित व्यक्ती कोणीही असू शकते – कुटुंबातील सदस्य किंवा तुमच्या विश्वासातील इतर कोणीही व्यक्ती. तुम्हाला नामनिर्देशित व्यक्तीची निवड अतिशय काळजीपूर्वक करावी लागते. कारण तुमचा मृत्यू झाल्यास अशा प्रसंगी तुमच्या मालमत्तेची काळजी घेण्यासाठी ती व्यक्ती विश्वासार्ह आणि पात्र असावी लागते.

नामनिर्देशन कुठे करता येईल?

एनएसडीएलच्या nsdl.co.in या संकेतस्थळावर जाऊन ‘नॉमिनेट ऑनलाइन’ हा पर्याय निवडून डीपी आयडी, पॅन क्रमांक याची माहिती देऊन ही प्रक्रिया पूर्ण करता येईल. गुंतवणूकदाराला एका फोलिओत तीनपर्यंत नामांकने नोंदविण्याचा आणि प्रत्येक नामनिर्देशित व्यक्तीला किती टक्के रक्कम मिळेल हे नमूद करण्याचा अधिकार आहे; परंतु जर टक्केवारी नमूद केली नाही तर प्रत्येक नामनिर्देशित व्यक्तीला समान भाग मिळेल.

नामनिर्देशन न केल्यास काय? नामनिर्देशन नसलेले किंवा वारसदारांच्या नामनिर्देशनाची माहिती दिलेली नसल्यास, अशी गुंतवणूक म्हणजेच म्युच्युअल फंड ‘फोलिओ’ गोठवले जाईल. परिणामी तुम्ही यापैकी कोणत्याही फोलिओमधून पैसे काढू शकणार नाही. मात्र त्यात ‘एसआयपी’ सुरू असल्यास गुंतवणूक सुरू राहील.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sebi extends deadline to add nominees in mutual funds demat accounts by june 2024 print eco news zws
First published on: 27-12-2023 at 23:41 IST