मुंबई : किरकोळ महागाई दर ४.८३ टक्के असा ११ महिन्यांच्या नीचांकी नरमल्याने भांडवली बाजारावर त्याचे सकारात्मक पडसाद उमटले आहे. निर्देशांकात सर्वाधिक योगदान राखणारी आणि शेअर बाजारातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजमधील किंमत वाढीने बाजारातील आशावाद वाढवला किरकोळ महागाई दर कमी झाला असला तरी एप्रिल महिन्यातील घाऊक महागाई दर १३ महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला आहे.

हेही वाचा >>> एप्रिलमध्ये वाहनांची विक्रमी विक्री

दिवसअखेर मुंबई शेअर बाजारातील निर्देशांक सेन्सेक्समध्ये ३२८.४८ अंशांची भर पडली आणि तो ७३,१०४.६१ पातळीवर स्थिरावला. दिवसभरातील सत्रात सेन्सेक्सने ५१०.१३ अंशांची झेप घेत ७३,२८६.२६ ही सत्रातील उच्चांकी पातळी गाठली. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये ११३.८० अंशांची वाढ झाली आणि तो २२,२१७.८५ पातळीवर बंद झाला.

किरकोळ महागाई दरातील घसरण आणि आशियातील इतर प्रमुख भांडवली बाजारातील अनुकूल संकेतांमुळे देशांतर्गत भांडवली बाजार नीचांकी पातळीपासून पुन्हा सावरला आणि सलग दुसऱ्या सत्रात सकारात्मक पातळीवर बंद झाला. मतदानाची घटलेली टक्केवारी लक्षात घेता नजीकच्या काळात बाजारात अस्थिरता कायम राहण्याची शक्यता आहे, असे मत जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले.

हेही वाचा >>> सीमेन्समधून सीमेन्स एनर्जी लिमिटेड वेगळी होणार

सेन्सेक्समध्ये महिंद्र अँड महिंद्र, लार्सन अँड टुब्रो, जेएसडब्ल्यू स्टील, एनटीपीसी, इंडसइंड बँक, सन फार्मा, अल्ट्राटेक सिमेंट, स्टेट बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि मारुती यांचे समभाग वधारले. तर नेस्ले, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, ॲक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, बजाज फायनान्स, आयटीसी, आणि एशियन पेंट्सच्या समभागात घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार, परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी सोमवारी ४,४९८.९२ कोटी रुपयांच्या समभागांची विक्री केली.

सेन्सेक्स ७३,१०४.६१ ३२८.४८ ( ०.४५%)

निफ्टी २२,२१७.८५ ११३.८० ( ०.५१%)

डॉलर ८३.५१  —

तेल ८३.२२ -०.१७