सेन्सेक्स ७२० अंशांनी वधारला; निफ्टीची १८ हजारांपुढे झेप मुंबई : सलग चार दिवस सुरू राहिलेल्या धास्तीयुक्त पडझड अनुभवणाऱ्या गुंतवणूकदारांना सोमवारचा सप्ताहारंभ मात्र सुखावणारा ठरला. भांडवली बाजारात मुख्यत: बँका, तेल आणि माहिती-तंत्रज्ञान समभागांमध्ये झालेल्या खरेदीमुळे सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही प्रमुख निर्देशांकांत एक टक्क्याहून मोठी जोमदार तेजी दिसून आली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ‘सेन्सेक्स’ ७२१.१३ अंशांनी (१.२० टक्के) वाढून ६०,५६६.४२ वर जाऊन दिवसअखेर स्थिरावला. सेन्सेक्समधील ३० पैकी २५ समभागांना तेजीमय मूल्यवाढ साधली. दिवसभरात हा निर्देशांक ९८८.४९ अंशांनी झेपावत ६०,८३३.७८ असा सत्रातील उच्चांकावर पोहोचला होता. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा ‘निफ्टी’ २०७.८० अंशांनी किंवा १.१७ टक्क्यांनी वाढून दिवसअखेरीस १८ हजारांच्या पातळीवर १८,०१४.६० वर स्थिरावला. निफ्टीमधील ५० पैकी ४० समभागांचे मूल्य वाढले. दीड टक्के वधारलेली आयसीआयसीआय बँक तर जवळपास एका टक्क्यांनी वाढलेली रिलायन्स इंडस्ट्रीज यांनी निर्देशांकातील तेजीला सर्वाधिक योगदान दिले. गेल्या आठवडय़ात शुक्रवारपर्यंत चार दिवस सुरू राहिलेल्या विक्रीत सेन्सेक्स १,९६० अंशांनी म्हणजेच ३.२९ टक्क्यांनी गडगडला, तर निफ्टी ६१३ अंश अर्थात ३.९९ टक्क्यांनी घरंगळला आहे. व्यापक बाजारपेठेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या बीएसई स्मॉलकॅप निर्देशांक ३.१३ टक्क्यांनी आणि मिडकॅप निर्देशांक २.३१ टक्क्यांनी म्हणजे सेन्सेक्स-निफ्टीच्या तुलनेत दुपटीहून अधिक मुसंडी घेत बंद झाला. त्यामुळे बाजारातील खरेदीचे स्वरूप सर्वव्यापी, किंबहुना आघाडीच्या समभागांपेक्षा, मधल्या व तळाच्या फळीतील समभागांमध्ये अधिक जोरदार होते. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये नफावसुलीमुळे घसरण अनुभवलेल्या आरोग्यसेवा निर्देशांकाव्यतिरिक्त अन्य सर्वामध्ये चांगली वाढ दिसून आली. मुसंडी कशामुळे? रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनशी वाटाघाटी करण्याची इच्छा दर्शविली आहे. ज्यामुळे तेल, वायू, खनिजे, अन्नधान्य इत्यादींनी समृद्ध असलेल्या दोन देशांमधील या दीर्घकाळ चाललेल्या लढाईला अखेर पूर्णविराम मिळेल आणि या जिनसांच्या जागतिक किमती नरमण्यास मदत होईल. गेल्या आठवडय़ात झालेल्या तीव्र स्वरूपाच्या विक्रीनंतर भांडवली बाजारात सप्ताहारंभाच्या सत्रात स्वाभाविकच मजबूत वाढ दिसून आली. वर्षसांगतेच्या सुट्टय़ांच्या परिणामी कोणतीही मोठी जागतिक घटना नसताना, बाजारातील एकंदर प्रवाह सकारात्मकतेच्या बाजूने राहण्याची अपेक्षा आहे. सोमवारची निर्देशांकांनी घेतलेली उसळी हे त्याचेच द्योतक आहे, असे निरीक्षण मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सव्र्हिसेसचे संशोधनप्रमुख सिद्धार्थ खेमका यांनी नोंदविले. युरोप, अमेरिका आणि काही आशियाई देशांमधील भांडवली बाजारातील व्यवहार हे नाताळ आणि वर्षसांगतेची सुट्टी असल्याने बंद आहेत. पडझडीनंतर भाव पातळीत तळ गाठलेल्या समभागांत वाढलेली मूल्यात्मक खरेदी आणि जगातील अन्य बाजारांतील आशावादी संकेतांमुळे देशांतर्गत बाजारात तेजीमय चैतन्य दिसून आले. विशेषत: सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या समभागांनी तेजीचे नेतृत्व केले, तर मिड आणि स्मॉल-कॅप समभागांनी मुसंडीमध्ये मुख्य निर्देशांकांनाही मागे टाकले. तथापि ही अपवादात्मक मुसंडी असून, जागतिक मंदीची चिंता आणि कोविडचा नव्याने प्रसार व त्याच्या आर्थिक परिणामांच्या टांगत्या तलवारीमुळे बाजारातील अस्थिरता कायम राहील, असे जिओजित फायनान्शियल सव्र्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी सूचित केले.