मुंबई : इस्रायल आणि इराणमधील वाढत्या तणावादरम्यान भू-राजकीय चिंतांना बाजूला सारून, तेल व वायू तसेच माहिती-तंत्रज्ञान समभागांमध्ये झालेल्या मूल्यात्मक खरेदीमुळे सोमवारी भांडवली बाजाराने सलग दोन सत्रातील झड रोखणारा मूडपालट दाखविला. पिंपामागे ७५ डॉलरपर्यंत चढलेल्या खनिज तेलाच्या किमतीतील नरमाईने आशियाई बाजारांमधील तेजीचे अनुकरण करीत, सेन्सेक्स-निफ्टी निर्देशांकांनी जवळपास एक टक्क्यांनी वाढ साधली.
सुरुवातीपासून तेजीमय राहिलेल्या सत्राअखेरीस सेन्सेक्स ६७७.५५ अंशांनी (०.८४ टक्के) वाढून ८१,७९६.१५ वर स्थिरावला. या निर्देशांकातील ३० पैकी २७ कंपन्यांचे समभाग वाढीसह बंद झाले. दिवसभरात सेन्सेक्सने ७४७.२२ अंशांच्या कमाईसह ८१,८६५.८२ चा उच्चांक गाठला होता. दुसरीकडे निफ्टी निर्देशांक २२७.९० अंशांनी (०.९२ टक्के) वाढून २४,९४६.५० पातळीवर बंद झाला. या निर्देशांकातील अवघे ४ समभाग घसरणीत होते, तर ४६ कंपन्यांच्या समभागांचे मूल्य वाढले. हा निर्देशांकही दिवसभरात अगदी समीप म्हणजे २४,९६७ अंशांच्या उच्चांकापर्यंत पोहोचला, पण भावनिकदृष्ट्या महत्त्वाच्या २५ हजारांच्या पातळीला गाठण्यास त्याला अपयश आले.
मागील दोन सत्रांमध्ये, सेन्सेक्स १,३९६.५४ अंशांनी (१.६९ टक्के) आणि निफ्टी ४२२.८ अंशांनी (१.६८ टक्के) घसरला आहे. गत दोन सत्रांमध्ये सर्वाधिक नुकसान सोसलेल्या तेल आणि वायू क्षेत्रातील समभागांमध्ये सोमवारी जोरदार खरेदी दिसून आली, तर अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेच्या (फेड) आगामी बैठकीसंबंधाने आशावादाने आयटी क्षेत्राने चांगली कामगिरी केली. फेडकडून याच बैठकीत तिच्या व्याजदर कपातीच्या दृष्टिकोनाबाबत अधिक स्पष्टता अपेक्षित आहे. लार्जकॅप समभागांच्या तुलनेत, व्यापक बाजारातही तुलनेने कमी परंतु खरेदीचा चांगला जोर दिसून आला. परिणामी बीएसई मिडकॅप निर्देशांक ०.९३ टक्क्यांनी आणि स्मॉलकॅप निर्देशांक ०.३८ टक्क्यांनी वधारला.
इस्रायल-इराण युद्धभडक्यासारखी प्रतिकूलता असूनही, लार्ज-कॅप समभागांमध्ये वाढ झाल्याने निर्देशांक वर गेले. अस्थिर बाह्य परिस्थितीतही गुंतवणूकदारांनी र्घकालीन मूलभूत गोष्टींवर लक्ष केंद्रित केले. तरी दक्षिण आशियातील भू-राजकीय घडामोडींचा नजीकच्या काळात बाजारावर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता असून, युद्धजन्य तणाव कमी होण्याची कोणत्याही संकेतांकडे बारकाईने आणि जिव्हाळ्याने पाहिले जात आहे, असे जिओजित इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडचे संशोधन प्रमुख विनोद नायर म्हणाले.
सेन्सेक्समधील अल्ट्राटेक सिमेंट सर्वाधिक २.३९ टक्क्यांनी वधारला. टेक महिंद्रा, एचसीएल टेक, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, इटर्नल, एशियन पेंट्स, टाटा स्टील आणि कोटक महिंद्रा बँक हे वधारलेले अन्य समभाग होते. या उलट टाटा मोटर्स, अदानी पोर्ट्स आणि सन फार्मा हे समभाग मागे पडले.