गेल्या दोन दिवसांपासून मुंबई शेअर बाजारात बहुतांश शेअर्स हिरव्या रंगात दिसत असल्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचं वातावरण होतं. गुरुवारी मात्र शेअर बाजारात पडझड झाल्याचं पाहायला मिळालं. सेन्सेक्सपाठोपाठ निफ्टीनंही उलटी वाट धरल्यामुळे मुंबई शेअर बाजारात अनेक शेअर हे लाल रंगात, अर्थात तोट्यात गेल्याचं दिसून आलं. यामागे अमेरिकेतील आर्थिक घडामोडी कारणीभूत असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.

Sensex १ हजार अंकांनी कोसळला

काही दिवसांपासून सेन्सेक्सनं धारण केलेली हिरवाई आज मोठ्या प्रमाणावर उतरल्याचं दिसून आलं. सेन्सेक्स तब्बल १.२७ टक्क्यांनी अर्थात तब्बल १०३६ अंकांनी कोसळला. बाजारातील व्यवहार बंद झाले तेव्हा सेन्स्केस जवळपास ८०,५०० अंकांपर्यंत स्थिरावला होता. यात सर्वाधिक नुकसान पॉवर ग्रीड, टेक महिंद्रा, एचसीएल टेक्नोलॉजीस, नेसले, हिंदुस्तान युनिलिव्हर, आयटीसी, टीसीएस आणि महिंद्रा अँड महिंद्रा यांचं झालं.

Nifty50 च्याही गटांगळ्या, सेन्सेक्सहून जास्त घसरला!

दरम्यान, एकीकडे सेन्सेक्स १.२७ टक्क्यांनी घसरला असताना दुसरीकडे निफ्टी५० थेट १.३२ टक्क्यांनी घसरला. बाजार बंद झाला तेव्हा निफ्टी ३२७ अंकांनी घसरून २४ हजार ४८५ पर्यंत खाली आला होता. याशिवाय NSE वरील सर्व १३ निदर्शक कोसळल्याचं दिसून आलं. निफ्टि मिडकॅप १०० ०.६ टक्क्यांनी तर निफ्टी स्मॉलकॅप १०० ०.३ टक्क्यांनी खाली आला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शेअर मार्केट कोसळण्याची कारणं काय?

मुंबई शेअर बाजारावर देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय अशा दोन्ही घटकांचा परिणाम होत असतो. आज झालेल्या पडझडीसाठी या दोन्ही प्रकारच्या गोष्टी कारणीभूत ठरल्याचा अंदाज तज्ज्ञांकडून मांडला जात आहे.

  • अमरिकेतील आर्थिक स्थिती – अमेरिकेची आर्थिक स्थिती भविष्यात नेमकी कशी असेल? याबाबत डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळे कमालीची संदिग्धता निर्माण झाली असून ती गुंतवणूकदारांमध्येही पाहायला मिळत आहे. अमेरिकेतील सिनेट सदस्य देशाच्या नव्या अर्थसंकल्पावर सध्या काम करत आहेत. यात करकपातीसंदर्भात घोषणा होण्याची शक्यता आहे. मात्र, करकपातीमुळे देशांतर्गत तुटीचं प्रमाण अधिक वाढण्याची चिंता शेअर बाजारातील मंडळींना वाटत आहे. याशिवाय मूडीनं याबाबतचं अमेरिकेचं मानांकन कमी केल्याचाही नकारात्मक परिणाम अमेरिकन शेअर बाजारात दिसून येत आहे.
  • आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमधील नकारात्मकता – दरम्यान, अमेरिकेतील आर्थिक स्थितीबरोबरच इतर आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये निर्माण झालेल्या नकारात्मत वातावरणाचाही फटका मुंबई शेअर बाजाराला बसल्याचं दिसून येत आहे. वॉल स्ट्रीट जर्नलवरील घडामोडींचा परिणाम आशियाई बाजारपेठांवर पडल्याचं पाहायला मिळत आहे. त्यात जपानचा निकेई २२५, दक्षिण कोरियाा कोस्पी व कोसडॅक आणि हाँगकाँगचा सेंग हे सर्व शेअर बाजार गुरुवारी जवळपास १ टक्क्यांनी घसरल्याचं दिसून आलं.
  • आयटी कंपन्यांवर नकारात्मक प्रभाव – अमेरिकेतील आर्थिक स्थितीमुळे भारतातील आयटी क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्सला चांगलाच फटका बसला. टेक महिंद्राचे शेअर्स २ टक्क्यांनी घसरून १५६४.७० वर आले. त्यामुळे निफ्टी आयटी निर्देशांकात नुकसान झालं. पर्सिस्टंट सिस्टीम, एचसीएल टेक आणि एमफेसिस यांचेही शेअर्स २ टक्क्यांनी घसरले.