लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी
मुंबई : सुविधा व्यवस्थापन आणि सुरक्षा रक्षक सेवा प्रदाता कंपनी क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस लिमिटेडच्या समभागांनी गुरुवारी भांडवली बाजारात सूचिबद्धतेला ११ टक्के अधिमूल्य मिळविले, मात्र बाजारबंद होतेवेळी समभाग सकाळच्या सत्रात मिळविलेले अधिमूल्य गमावत घसरणीसह बंद झाले.
मुंबई शेअर बाजारात क्रिस्टलचा समभाग ११.१८ टक्क्यांच्या अधिमूल्यासह ७९५ रुपयांवर सूचिबद्ध झाला. नंतर, समभागाने दिवसभरात १.६७ टक्के गमावत ७०३.०५ रुपयांची सत्रातील नीचांकी पातळी गाठली. तर राष्ट्रीय शेअर बाजारात समभाग ९.७९ टक्क्यांच्या वाढीसह ७८५ रुपयांवर सूचिबद्ध झाला. दिवसअखेर समभाग समभाग ०.३० टक्क्यांनी घसरून ७१२.८५ रुपयांवर बंद झाला.
हेही वाचा >>>कृत्रिम प्रज्ञेत भारताकडून जगाचे नेतृत्व – मोदी
क्रिस्टलच्या प्रारंभिक समभाग विक्रीला (आयपीओ) १३.२१ पट प्रतिसाद लाभला होता. कंपनीने भांडवली बाजारातून ३०० कोटी रुपयांची निधी उभारणी केली. आयपीओपश्चात प्रत्येकी ७१५ रुपये किमतीला पात्र गुंतवणूकदारांना कंपनीचे समभाग वितरीत करण्यात आले. सध्याच्या समभागाच्या भावानुसार कंपनीचे बाजार भांडवल ९९५ कोटी रुपये झाले आहे.
फोटो ओळ – क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस लिमिटेडच्या समभागांच्या गुरुवारी मुंबई शेअर बाजारातील सूचिबद्धतेच्या समारंभाला, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कंपनीचे संस्थापक आमदार प्रसाद लाड, बीएसईचे मुख्य व्यवसाय अधिकारी समीर पाटील आणि क्रिस्टलच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालिका नीता लाड.