जनसामान्यांना कठीण प्रसंगात सोने तारण ठेऊन जलद कर्ज मिळविणे मदतकारक ठरते, त्यामुळे छोट्या कर्जदारांसाठी खासगी क्षेत्रातील साउथ इंडियन बँकेने दिलासा देणारा निर्णय घेतला असून, त्यांना त्यांच्या सोन्याच्या मूल्याच्या ९० टक्क्यांपर्यंत कर्ज आता मिळविता येईल. आतापर्यंत बँकांकडून कर्जा रक्कम सोन्याच्या मूल्याच्या कमाल ७५ टक्के भरेल इतकीच निर्धारीत केली जात होती.
साउथ इंडियन बँकेने एसआयबी गोल्ड एक्सप्रेस हे एक नवीन सुवर्ण कर्ज उत्पादन सुरू केले असून त्याअंतर्गत ग्राहकांना जलद आणि सोयीस्कर पद्धतीने कर्ज उपलब्ध करून देणार आहे. या योजनेद्वारे, कर्जदार त्यांच्या सोन्याच्या मूल्याच्या ९० टक्क्यांपर्यंत कर्ज प्राप्त करून करू शकतात. बँकेने २५,००० ते २५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज तीन वर्षांपर्यंतच्या कालावधीसह उपलब्ध करून दिले आहे. एमएसएमई, बिगर-एमएसएमई आणि लघु व्यवसायांना लक्ष्य करून, हे उत्पादन ग्राहकांना व्यवसाय विस्तार, कार्यरत भांडवलाच्या गरजा किंवा वैयक्तिक उपक्रमांना सहजपणे निधी उपलब्ध करून देण्यास सक्षम आहे. कर्जदारांसाठी संपूर्ण पारदर्शकता सुनिश्चित केली असून कोणतेही छुपे खर्च आकारले जाणार असल्याचे बँकेने संगितले आहे.
एसआयबी गोल्ड एक्सप्रेससाठी पात्रता प्रक्रिया सोपी असून डिजिटल पद्धतीने पूर्ण केली जाऊ शकते. ग्राहक त्यांचे दागिने पूर्ण सुरक्षिततेची हमी देऊन साउथ इंडियन बँकेच्या देशातील कोणत्याही शाखेत गहाण ठेवू शकतात.
काही महिन्यांपूर्वी, रिझर्व्ह बँकेने सोने तारण कर्जाबाबत एक धोरण मसुदा तयार केला होता. त्याबाबत संबंधित भागधारकांची सल्लामसलत आणि होणाऱ्या परिणामांचे मूल्यांकन केल्यानंतर अंतिम निर्देश तयार केले गेले आहेत. नवीन सोने तारण कर्जाच्या नियमांत सोन्याच्या मालकीबाबत स्पष्टता आणली गेली आहे. परंपरागत स्वरूपात एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे आलेले सोन्याबाबत खरेदीच्या पावत्या सादर करता आल्या नाहीत, तर कर्जदाराने सोने तारण ठेवताना स्व-घोषित प्रतिज्ञापत्र दिले तरी चालणार आहे.