वृत्तसंस्था, नवी दिल्ली
शिक्षणतंत्रज्ञान क्षेत्रातील बायजू या नवउद्यमी कंपनीने बंगळुरूतील देशातील सर्वांत मोठे कार्यालय रिकामे केले आहे. खर्चात कपात करण्यासाठी कंपनीने हे पाऊल उचलले आहे. याचबरोबर कंपनीने शहरातील दुसऱ्या कार्यालयातील काही भागही रिकामा केला आहे.
बायजूची बंगळुरूमध्ये तीन कार्यालये आहेत. यात कल्याणी टेक पार्कमधील ५.५८ लाख चौरस फुटांच्या कार्यालयाचा समावेश आहे. हे कार्यालय कंपनीने रिकामे केले आहे. कंपनीने कर्मचाऱ्यांना दुसऱ्या कार्यालयातून अथवा घरून काम करण्याच्या सूचना केल्या आहेत. कंपनीने प्रेस्टिज टेक पार्कमधील कार्यालयातील नऊपैकी दोन मजले रिकामे केले आहेत. कंपनीतील काही कर्मचाऱ्यांनाही या घडामोडींना दुजोरा दिला आहे. बायजूची देशभरात एकूण ३० लाख चौरस फुटांहून अधिक क्षेत्रफळाची भाड्याची कार्यालये आहेत. कंपनीकडून गरजेनुसार त्यांचा वापर केला जातो. कार्यालयीन जागेचा विस्तार अथवा कपात करण्याचा निर्णय कंपनीची काम करण्याची धोरणे आणि व्यावसायिक प्राथमिकता यांच्यानुसार घेतला जातो. ही नियमित प्रक्रिया असून, त्यातून कार्यक्षमतेत वाढ होते, अशी प्रतिक्रिया बायजूच्या प्रवक्त्याने दिली.
हेही वाचा – कॉफी डे ग्लोबल दिवाळखोरीत, ‘एनसीएलटी’कडून याचिका मंजूर
कर्ज अटी-शर्तींत सुधारणांस सहमतीचा दिलासा
अडचणीत सापडलेल्या बायजूसाठी एक सुवार्ता म्हणजे तिच्या विदेशातील उसनवारी आणि त्यावरील न्यायालयीन कज्जातून मार्ग सोमवारी दृष्टीपथात आला आहे. १२० कोटी डॉलरचे कर्ज देणाऱ्या ऋणको गटाच्या सुकाणू समितीने सोमवारी तिच्या कर्जफेडीबाबत नव्याने अटी-शर्ती येत्या ३ ऑगस्टपर्यंत निर्धारीत करण्याला सहमती दर्शवली आहे. बायजूला कर्ज देणाऱ्या गटाचा एक भाग असलेली गुंतवणूक व्यवस्थापन कंपनी रेडवूडने अमेरिकी न्यायालयात खटला दाखल केल्यावर एका महिन्यानंतर ही बातमी आली आहे.