लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

मुंबई: देशातील सर्वात मोठी कर्ज देणारी स्टेट बँकेने मुदत ठेवींवर व्याजदरात २० आधार बिंदूंची (०.२० टक्के) कपात सरलेल्या १६ मेपासून लागू केली आहे. रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कपात करून, कर्जे स्वस्त केल्याचा परिणाम म्हणून ठेवीदारांना मिळणाऱ्या लाभात कपात होणे स्वाभाविक आहे.  स्टेट बँकेकडून दोन महिन्यांत केली गेलेली ही दुसरी ठेवींवरील व्याजदरातील कपात असून, तिच्या या पावलांचे अनुकरण लवकरच अन्य बँकांकडून सुरू होईल.

स्टेट बँकेच्या संकेतस्थळावरील तपशिलानुसार, ३ कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेच्या किरकोळ मुदत ठेवींवरील व्याजदरात कपात सामान्य जनता आणि ज्येष्ठ नागरिक दोघांनाही लागू झाली आहे. दोन वर्षे ते तीन वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या ठेवींवर आता जास्तीत जास्त ६.७ टक्के व्याज मि‌ळेल. तसेच तीन वर्षे ते पाच वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या ठेवींवर १६ मे पासून ६.५५ टक्के व्याज लागू झाले आहे. पाच वर्षे ते १० वर्षे कालावधीच्या मुदत ठेवींवर आता सर्वसामान्यांना ६.३० टक्के व्याज, तर एक वर्ष ते दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या ठेवींवर ६.५ टक्के व्याज मिळेल.

‘अमृत वृत्ती’ (४४४ दिवस) या विशिष्ट कालावधीच्या योजनेचा व्याजदरही १६ मे २०२५ पासून ७.०५ टक्क्यांवरून ६.८५ टक्के करण्यात आला आहे. ज्येष्ठ नागरिक आणि अतिज्येष्ठ नागरिक (८० वर्षांवरील वय) यांच्यासाठीचे व्याजदर अतिरिक्त लाभांसाठी पात्र असतील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रिझर्व्ह बँकेने रेपो दरात केलेल्या कपातीचा आधार घेत गेल्या महिन्यातही स्टेट बँकेच्या ठेवींच्या व्याजदरात १० ते २५ आधार बिंदूंची अर्थात पाव टक्क्यांपर्यंतची कपात केली होती.