पुणे : ग्रामीण भागात इंटरनेटचा वेग कमी असलेल्या ठिकाणी वापरता येईल, अशा पद्धतीने ‘भीम ३.०’ उपयोजनाची (ॲप) रचना करण्यात आली आहे. याचबरोबर सध्या हे उपयोजन १५ भारतीय भाषांमध्ये वापरता येते. आगामी काळात एकूण २२ भाषांमध्ये हे उपयोजन उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यातून वित्तीय समावेशनाला गती मिळेल, अशी माहिती नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) भीम सर्व्हिसेसच्या व्यवस्थापकीय संचालिका व मुख्याधिकारी ललिता नटराज यांनी दिली.
भीम उपयोजनाचा वापर शहरी भागात ५५ ते ६० टक्के असून, उर्वरित ग्रामीण भागात आहे. केंद्र सरकारच्या वित्तीय समावेशनाचा धोरणाला गती देण्यासाठी छोटी शहरे आणि ग्रामीण भागात विस्तार करण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे इंटरनेटचा कमी वेग असलेल्या ठिकाणीही योग्य पद्धतीने कार्य करेल, अशी या उपयोजनाची रचना करण्यात आली. यामुळे दुर्गम भागात या उपयोजनाचा वापर वाढण्यास मदत होईल. याचवेळी स्थानिक भाषांमधून या उपयोजनाची सेवा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. सध्या १५ भाषांतून ही सेवा दिली जात आहे. त्यामुळे नागरिकांना त्यांच्या भाषेत व्यवहार करता येत आहेत. आगामी काळात एकूण २२ भाषांतून ही सेवा दिली जाईल. यामुळे या उपयोजनाचा वापर करणे आणखी सुलभ होईल, असे नटराज यांनी सांगितले.
भीम उपयोजनाच्या ३.० आवृत्तीचे मार्च महिन्यात अनावरण करण्यात आले. या उपयोजनाच्या माध्यमातून जून महिन्यात ७ कोटी ९५ लाख व्यवहार झाले. त्यांचे एकूण मूल्य १२ हजार ११० कोटी रुपये होते. गेल्या वर्षीच्या जूनच्या तुलनेत यंदा व्यवहारात २१२ टक्के आणि मूल्यात ४६ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. या उपयोजनात आता अनेक नवीन वैशिष्ट्ये सामावण्यात आली आहेत. त्यामुळे त्याचा वापर अधिक चांगल्या पद्धतीने करता येतो. जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचून त्यांना सेवा देण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे नटराज यांनी नमूद केले.
‘भीम ३.०’ची वैशिष्ट्ये
– खर्च विभागणी – कुटुंब आणि मित्रांमध्ये खर्चाची विभागणी
– कुटुंब मोड – कुटंबातील सदस्यांचा सामाईक खर्च करण्याची सुविधा
– खर्चाचे विश्लेषण – मासिक खर्चाचा ताळेबंद आणि त्याचे विश्लेषण
– यूपीआय सर्कल – दुसऱ्या व्यक्तीला मर्यादित व्यवहार करण्याचे अधिकार
– सेवांची निवड – वापरकर्त्याच्या गरजेनुसार आवश्यक तेवढ्या सेवांची निवड