मुंबई: अमेरिका-रशिया दरम्यान अलास्का येथे १५ ऑगस्टला होऊ घातलेल्या चर्चेपूर्वी गुंतवणूकदारांची चाल सावध बनल्याने गुरुवारी अत्यंत अस्थिर व्यवहाराअंती, प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी जेमतेम त्यांचा स्तर टिकवण्यात यशस्वी ठरले.
मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ५७.७५ अंशांनी वधारून ८०,५९७.६६ पातळीवर स्थिरावला. व्यवहार मंदावलेल्या बाजारात, दिवसभरात त्याला २११.२७ अंशांची उच्चांकी पातळी गाठता आली होती. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ११.९५ अंशांनी वधारून २४,६३१.३० पातळीवर दिवसअखेर स्थिरावला. व्यवहाराचा शेवटचा तास असताना, भारताचे सार्वभौम पतमानांकनांत तब्बल १८ वर्षांनंतर ‘बीबीबी’ असा सुधार करणारे एस अँड पी ग्लोबल रेटिंग्जच्या निर्णयाचे वृत्त आले, तरी ही स्वागतार्ह बातमी बाजारात अपेक्षित उत्साह निर्माण करू शकली नाही.
सरलेल्या आठवड्यात मात्र, सेन्सेक्सने ७३९.८७ अंश म्हणजेच ०.९२ टक्क्यांची, तर निफ्टीने २६८ अंशांची कमाई केली. गत दोन वर्षातील साप्ताहिक घसरणीची सर्वात मोठी मालिका यातून खंडित झाली. सलग पाच आठवड्यांच्या घसरणीपासून फारकत घेत सेन्सेक्स-निफ्टीने ही साप्ताहिक वाढ साधली.
अमेरिका-रशिया शिखर परिषदेपूर्वी गुरुवारच्या सत्रात गुंतवणूकदारांनी सावधगिरीने व्यवहार केले. अमेरिकेतील महागाईमध्ये झालेली घसरण आणि आगामी काळातील व्याजदर घसरणीच्या आशेने माहिती-तंत्रज्ञान आणि औषधी निर्माण क्षेत्रातील समभागांमध्ये वाढ झाली. याबरोबरच बँकिंग आणि ग्राहकोपयोगी वस्तू क्षेत्रातील समभाग वधारले, असे जिओजित इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडचे संशोधन प्रमुख विनोद नायर म्हणाले. स्वातंत्र्यदिनानिमित्त सार्वजनिक सुटी असल्याने शुक्रवारी, १५ ऑगस्टला शेअर बाजार बंद राहतील.
सेन्सेक्समधील कंपन्यांमध्ये इन्फोसिस, एशियन पेंट्स, एचडीएफसी बँक, बजाज फिनसर्व्ह आणि टायटन यांचे समभाग तेजीत होते. तर टाटा स्टील, टेक महिंद्र, अदानी पोर्ट्स आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स यांच्या समभागात विक्रीच्या माऱ्याने घसरण झाली. बुधवारच्या सत्रात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी ३,६४४.४३ कोटी रुपये मूल्याचे समभाग वधारले, तर देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी ५,६२३.७९ कोटी रुपये मूल्याचे समभाग खरेदी केले.