मुंबई : बँकिंग क्षेत्रातील समभागांमध्ये संचारलेला उत्साह आणि तेल कंपन्यांच्या समभागांमध्ये गुंतवणूकदारांनी लावलेल्या खरेदीच्या सपाट्यामुळे प्रमुख निर्देशांक ‘सेन्सेक्स’ने ५४० अंशांची मजल मारली. निफ्टी देखील २५,२०० अंशांच्या पातळीपुढे बंद होण्यास यशस्वी ठरला. जपानने अमेरिकेशी व्यापार करार केल्यानंतर आशियाई बाजारांमध्ये सकारात्मक कल दिसून आला.
बुधवारच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ५३९.८३ अंशांनी वधारून ८२,७२६.६४ पातळीवर स्थिरावला. दिवसभरात त्याने ५९९.६२ अंशांची कमाई करत ८२,७८६.४३ यात सत्रातील उच्चांकी पातळीला स्पर्श केला. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये १५९ अंशांनी वाढ झाली आणि तो २५,२१९.९० पातळीवर स्थिरावला.
भारतीय भांडवली बाजाराने आर्थिक वर्ष २०२६ च्या पहिल्या तिमाहीच्या उत्पन्नात संमिश्र वाढ नोंदवत लवचिकता दाखवली. अमेरिका-जपान व्यापार कराराच्या आशावादामुळे जागतिक स्तरावर सकारात्मक संकेतांनी बाजारात उत्साह संचारला. याव्यतिरिक्त, भारत-इंग्लंडमधील मुक्त व्यापार करार अंतिम टप्प्याच्या दिशेने पुढे जात असल्याच्या वृत्ताने तेजीला हातभार लावला आहे. जागतिक व्यापार वाटाघाटींमध्ये होणाऱ्या सकारात्मक घडामोडींमुळे व्यापार तणाव कमी होण्याची आणि बाजारपेठेतील स्थिरता वाढण्याची अपेक्षा आहे. वाढलेले मूल्यांकन चिंतेचा विषय असला तरी, बाजारातील सध्याची ताकद नजीकच्या काळात कमाई पुनर्प्राप्तीची शक्यता दर्शवते, असे मत जिओजित इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी व्यक्त केले.
सेन्सेक्समधील आघाडीच्या कंपन्यांमध्ये टाटा मोटर्स २.५१ टक्क्यांनी वधारला. त्यापाठोपाठ भारती एअरटेल, बजाज फायनान्स, मारुती, बजाज फिनसर्व्ह, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे समभाग तेजीत होते. तर खासगी क्षेत्रातील बँक असलेल्या एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँकेने ५२ आठवड्यांतील उच्चांकी पातळी गाठली. सलग पाच सत्रातील घसरणीनंतर रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये गुंतवणूकदारांनी खरेदी केल्याने निर्देशांकांना बळ मिळाले. मात्र बुधवारच्या तेजीच्या सत्रात हिंदुस्तान युनिलिव्हर, अल्ट्राटेक सिमेंट, भारत इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटीसी यांची कामगिरी निराशाजनक राहिली. मुंबई शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (एफआयआय) मंगळवारी ३,५४८.९२ कोटी रुपये मूल्याच्या समभागांची विक्री केली. तर देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (डीआयआय) ५,२३९.७७ कोटी रुपये मूल्याचे समभाग खरेदी केले.
कोणते क्षेत्र किती वधारले?
बीएसई क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये, दूरसंचार क्षेत्र १.१४ टक्क्यांनी वधारले, त्यापाठोपाठ ऑटो (०.८६ टक्के), बँकेक्स (०.७५ टक्के), टेक (०.७४ टक्के), वित्तीय सेवा (०.७० टक्के), आरोग्यसेवा (०.७० टक्के) आणि ऊर्जा (०.६५ टक्के) यांचा क्रमांक लागतो. तर दुसरीकडे गृहनिर्माण क्षेत्र २.६० टक्के, एफएमसीजी (०.४६ टक्के), भांडवली वस्तू (०.३१ टक्के) आणि सेवा क्षेत्रात (०.२० टक्के) घसरण झाली.
आशियाई बाजारपेठेत, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जपानसोबत व्यापार करार जाहीर केल्याने जपानचा निक्केई-२२५ निर्देशांक ३.५१ टक्क्यांनी वधारला. जपानमधून आयात केलेल्या वस्तूंवर १५ टक्के कर लावण्यात आला. आशिका इन्स्टिट्यूशनल इक्विटीजच्या मते, जागतिक स्तरावर, अमेरिका-जपान व्यापार कराराच्या आशावादी घडामोडींमुळे गुंतवणूकदारांच्या भावना उंचावल्या आहेत, ज्यामुळे नजीकच्या भविष्यात आणखी आंतरराष्ट्रीय करार होण्याची अपेक्षा वाढली आहे.
सेन्सेक्स ८२,७२६.६४ ५३९.८३ ( ०.६६%)
निफ्टी २५,२१९.९० १५९ ( ०.६३%)
तेल ६८.२९ -०.४५%
डॉलर ८६.४१ ३ पैसे