मुंबई: व्यवहार अनियमिततेमुळे अडचणीत असलेल्या खासगी क्षेत्रातील पाचव्या क्रमांकाची बँक असलेल्या इंडसइंड बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक सुमंत कथपालिया यांनी मंगळवारी तात्काळ प्रभावाने त्यांच्या पदाचा राजीनामा देत असल्याचे घोषित केले. त्या आधी सोमवारी बँकेतील दुसऱ्या क्रमांकाचे प्रमुख अधिकारी असलेले – उपमुख्य कार्यकारी अरुण खुराणा यांनीही पदावरून पायउतार होत असल्याचे जाहीर केले आहे.
कथपालिया यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून मंगळवारची (२९ एप्रिल) कामकाजाची वेळ पूर्ण केल्यानंतर पदत्याग केला, असे बँकेने शेअर बाजारांना अधिकृतपणे कळविले. ‘माझ्या निदर्शनास आणून देण्यात आलेल्या विविध कृती, त्रुटी/उणीवांची मी नैतिक जबाबदारी स्वीकारतो. आज कामकाजाच्या वेळेच्या समाप्तीसह माझा राजीनामा नोंदवून घ्यावा अशी मी विनंती करतो,’ असे कथपालिया यांनी बँकेच्या संचालक मंडळाला उद्देशून लिहिलेल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे.
उल्लेखनीय म्हणजे हिशेबातील तफावतीमुळे १,९६० कोटी रुपयांचा तोटा झाल्याचे उघडकीस आलेल्या या बँकेत या दोन अधिकाऱ्यांनी कर्मचारी भाग-मालकी योजनेचे (ईसॉप) लाभार्थी म्हणून मिळविलेल्या समभागांची २०२३ आणि २०२४ दरम्यान १५७ कोटी रुपये मूल्याला विक्री करून कथित नफा कमावल्याचे दिसले आहे.
१५ एप्रिलला या हिंदुजा बंधूंच्या मालकीच्या बँकेने हिशेबातील त्रुटी आणि त्यातून सुमारे २,००० कोटी रुपयांचा तोटा संभवत असल्याचा स्वत:हून उलगडा केला होता. त्या आधी रिझर्व्ह बँकेने कथपालिया यांना बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून संचालक मंडळाने मंजूर केलेला तीन वर्षांचा कार्यकाळ अमान्य करत, त्यांना केवळ एक वर्षच त्या पदावर राहता येईल, असे बँकेला कळविले होते.
कथपालिया आणि खुराणा यांच्या राजीनाम्यापूर्वी, इंडसइंड बँकेचे मुख्य वित्तीय अधिकारी गोविंद जैन यांनी घोटाळा पटलावर येण्यापूर्वीच जानेवारीमध्ये राजीनामा देत बँकेची साथ सोडली आहे. हिशेबातील त्रुटी राहिल्या असल्याचे बँकेच्या गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये लक्षात आल्याचे आधीच बँकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. म्हणजेच आर्थिक व्यवस्थापनाचीच जबाबदारी असणाऱ्या जैन यांना राजीनामा देताना आगामी संकटाची चाहूल लागली होती.