टोकियो : जपानची आघाडीची वाहन उत्पादक कंपनी असलेल्या सुझुकी मोटरने तिच्या लोकप्रिय ‘स्विफ्ट’ मोटारीचे उत्पादन तात्पुरते थांबविले आहे. चीनने दुर्मिळ खनिज संयुगाच्या (रेअर अर्थ मिनरल्स) निर्यातीवर बंधने आणल्यामुळे उत्पादनावर परिणाम झाला आहे, असे या प्रकरणाशी परिचित असलेल्या दोन व्यक्तींनी सांगितले.
चीनच्या निर्यात निर्बंधांमुळे प्रभावित होणारी ही जपानमधील पहिली वाहन उत्पादक कंपनी आहे. दुर्मिळ खनिज संयुगाच्या कमतरतेचे कारण देत स्विफ्ट स्पोर्ट वगळता इतर प्रकारातील स्विफ्टचे उत्पादन २६ मे पासून थांबविले गेले आहे. कंपनीने उत्पादन पुन्हा सुरू करण्याच्या योजना अनेक वेळा पुढे ढकलली आहे. सुझुकी आता १३ जून रोजी उत्पादन अंशतः पुन्हा सुरू करण्याची अपेक्षा आहे आणि १६ जूननंतर ते पूर्ण पुन्हा सुरू होईल, असे तिने एका निवेदनात स्पष्ट केले आहे.
एप्रिल महिन्यात चीनने विविध प्रकारची दुर्मिळ खनिज संयुगे आणि चुंबकांची निर्यात तात्पुरती बंद करण्याच्या निर्णय घेतला. यामुळे वाहन निर्माते, एरोस्पेस उत्पादक, सेमीकंडक्टर कंपन्या आणि लष्करी कंत्राटदारांसाठी केंद्रस्थानी असलेल्या पुरवठा साखळ्यांना धक्का बसला आहे. जागतिक वाहन उत्पादकांनी संभाव्य उत्पादन थांबविण्याचा इशारा दिल्याने परिस्थितीबद्दल चिंता वाढली आहे.
वाहनांचे सुटे भाग निर्मिती करणाऱ्या काही युरोपातील प्रकल्पांनी उत्पादन थांबवले आहे. आलिशान वाहनांची निर्मिती करणारी मर्सिडीज-बेंझ दुर्मिळ संयुगाच्या कमतरतेपासून संरक्षण म्हणून विविध पर्यायांची चाचपणी करत आहे. अमेरिका आणि जपान दरम्यान होणाऱ्या व्यापार शुल्कावरील बैठकीत दुर्मिळ संयुगाच्या पुरवठा साखळीबाबत चर्चा करून अमेरिकेसह सहकार्य मजबूत करण्याचा प्रस्ताव ठेवला जाण्याची योजना आहे, असे जपानच्या निक्केई बिझनेस डेलीने गुरुवारी वृत्त दिले.