लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

Tata Consultancy Services News: मुंबई: भारतातील सर्वात मोठी आयटी कंपनी असलेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस अर्थात टीसीएसने काही दिवसांपूर्वी जगभरातील तिच्या एकूण मनुष्यबळाच्या २ टक्के म्हणजेच तब्बल १२ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले जाणार असल्याचे जाहीर केले होते. तसेच पगारवाढही रोखल्याची बातमी समोर आली होती. मात्र आता टीसीएसकडून प्रत्यक्षात ८० टक्के कर्मचाऱ्यांचा पगार वाढविला गेला आहे.

नोकरकपातीच्या घोषणेनंतर पगारवाढीचे संकेत दिल्यामुळे टीसीएसच्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. जव‌ळपास ८० टक्के कर्मचाऱ्यांना कंपनीने ही वेतनवाढीची भेट दिली आहे. टीसीएसने कर्मचाऱ्यांना ४.५ ते ७ टक्के वेतनवाढ दिली आहे, अशी माहिती सूत्रांनी मंगळवारी दिली.

टाटा समूहातील या अग्रणी कंपनीने कर्मचाऱ्यांना सोमवारी (१ सप्टेंबर) रात्री वेतनवाढीची पत्रे ई-मेलद्वारे पाठविली, असे वृत्तसंस्थेने म्हटले आहे. ही वेतनवाढ चालू महिन्यापासूनच लागू करण्यात आली आहे. मात्र कंपनीने अद्याप या प्रकरणी अधिकृतपणे कोणतीही घोषणा केलेली नाही. गेल्या दोन महिन्यांपासून टीसीएस वेगळ्या कारणासाठी चर्चेत आहे. कंपनीने तिच्या २ टक्के मनुष्यबळाची म्हणजेच सुमारे १२ हजार कर्मचाऱ्यांची कपात करण्याची घोषणा केली होती. त्यामुळे कंपनीवर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. बाजारपेठेतील खराब व्यावसायिक परिस्थितीमुळे कंपनीने हे पाऊल उचलल्याचे म्हटले होते.

आता कंपनीने ८० टक्के कर्मचाऱ्यांच्या वेतनांत वाढ केली आहे. काही माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, या वेतनवाढीस पात्र ठरलेले कर्मचारी हे कनिष्ठ आणि मध्यम श्रेणीतील आहेत. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना १० टक्क्यांपर्यंत वेतनवाढ देण्यात आली आहे. दरम्यान, टीसीएस सोडून बाहेर पडणाऱ्या कर्मचाऱ्यांचे प्रमाण जून महिन्यात वाढून १३.८ टक्क्यांवर पोहोचले. जूनअखेर संपलेल्या तिमाहीचे निकाल जाहीर करताना कंपनीनेच ही माहिती दिली होती.

तरी नोकरकपात अटळ

दरम्यान टीसीएसने वेतनवाढीची घोषणा केली असली तरी नोकरकपात अटळ असल्याचेही सांगण्यात येत आहे. टीसीएसच्या नोकरकपातीच्या घोषणेमुळे आयटी क्षेत्रात वेगाने होत असलेल्या बदलांची देखील चर्चा होत आहे. जागतिक आर्थिक अनिश्चितता, अमेरिकेच्या टॅरिफ धोरणाचा आऊटसोर्सिंगवर झालेला परिणाम आणि एआय म्हणजेच कृत्रिम प्रज्ञा तंत्रज्ञानाच्या प्रभावातून सुरू असलेली उलथापालथ, अशा आव्हानांचा सामना सध्या देशाचे आयटी क्षेत्र करत आहे.