नवी दिल्ली : आयटी क्षेत्रतील दिग्गज कंपनी असलेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने (टीसीएस) दीर्घकाळ सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना ‘निलंबन भत्ता’ (सेव्हरन्स पॅकेज) देऊ करत असल्याचे म्हटले आहे. ज्यांचे कौशल्य आता कंपनीच्या बदलत्या गरजांशी जुळत नाही अशा कमी केल्या जाणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ही योजना कंपनीने आणली असल्याचे वृत्त आहे.
ग्राहकांची कार्यादेशाच्या माध्यमातून बदलती मागणी आणि वाढत्या ऑटोमेशनमुळे आवश्यक ठरलेल्या पुनर्रचनेअंतर्गत टीसीएसने अनेक बदल केले आहेत. प्रामुख्याने ज्यांची कौशल्ये कमी असलेल्या आणि ज्यांना ग्राहकांच्या गरजांशी जुळवून घेण्यास अडचणी येत आहेत अशा कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात येत आहे. या प्रभावित कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांचा ‘नोटिस पीरियड पे’ मिळणार आहे, त्यानंतर कार्यकाळानुसार सहा महिने ते दोन वर्षांपर्यंतचा सेव्हरन्स पॅकेज मिळणार असल्याचे वृत्त आहे. असे सेव्हरन्स पॅकेज कर्मचाऱ्याला आर्थिक भरपाई म्हणून दिली जाते.
सेवेत १०-१५ वर्षे असलेल्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती म्हणून सुमारे दीड वर्षांचा पगार मिळू शकतो. १५ वर्षांपेक्षा जास्त सेवा असलेल्या कर्मचाऱ्यांना सर्वाधिक लाभ, तर आठ महिन्यांपेक्षा जास्त काळ काम न केलेल्या कर्मचाऱ्यांना फक्त तीन महिन्यांचा नोटीस काळ वेतन दिले जाते. या वर्षी जुलैमध्ये, टीसीएसने त्यांच्या जागतिक कर्मचाऱ्यांपैकी सुमारे २ टक्के कर्मचारी कमी करण्याची योजना आखली आहे, ज्यामुळे ‘एआय’च्या परिवर्तन युगात कंपनी अधिक जलदपणे कामकाज करून शकेल.
सध्या टीसीएसमध्ये ६,१३,०६९ कर्मचारी कार्यरत असून, १२,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कमी केले जाणार आहेत. कंपनीच्या इतिहासातील ही दुसरी मोठी नोकरकपात आहे. या आधीची पहिली कपात २०१२ मध्ये झाली होती. तेव्हा सुमारे २,५०० कर्मचाऱ्यांना खराब कामगिरीमुळे कामावरून काढून टाकण्यात आले होते.