टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस अर्थात टीसीएस ही टाटा समूहातील सर्वात मूल्यवान कंपनी आहे.टीसीएसच्या बाजारभांडवलात सध्या मोठी घसरण झाली आहे. वर्ष २००८ च्या जागतिक आर्थिक संकटानंतरच्या सर्वात काळ्या टप्प्यात प्रवेश केला आहे. टाटा समूहातील या रत्नाचे बाजारमूल्य जवळपास ५.६६ लाख कोटी रुपयांनी घसरले आहे. टीसीएसचा समभाग त्याच्या ४,५८५.९० सर्वोच्च शिखरावरून ३४ टक्क्यांनी घसरला आहे. याआधी २०१८ मध्ये म्हणजेच १७ वर्षांपूर्वी ५५ टक्के घसरण त्यात झाली होती. त्यामुळे २००८ च्या जागतिक आर्थिक संकटातनंतर २०२५ हे वर्ष टीसीएससाठी सर्वात वाईट वर्ष बनले आहे. विद्यमान वर्ष २०२५ मध्येच या शेअरमध्ये २६ टक्के घट झाली आहे, ज्यामुळे त्याचे बाजारमूल्य १६.५९ लाख कोटी रुपयांच्या शिखरावरून १०.८९ लाख कोटी रुपयांवर आले आहे.
मागणीतील कमकुवत परिस्थिती, जनरेटिव्ह एआयचा प्रतिकूल परिणाम आणि पहिल्या तिमाहीतील संमिश्र कामगिरी या सर्वांमुळे परदेशी गुंतवणूकदारांचे (एफआयआय) पलायन सुरू झाले आहे. एकेकाळी भारतीय आयटीला त्यांचा आवडता व्यवसाय मानणाऱ्या परदेशी गुंतवणूकदारांनी जून २०२४ मध्ये टीसीएसमधील हिस्सेदारी १२.३५ टक्क्यांवरून जून २०२५ मध्ये ११.४८ टक्क्यांपर्यंत कमी केली आहे. त्यांच्या या समभाग विक्रीमुळे या क्षेत्रात आणखी जास्त नुकसान झाले आहे. निफ्टी आयटी निर्देशांक या वर्षी आतापर्यंत २५ टक्के घसरला आहे, ज्यामुळे तो बाजारातील सर्वात वाईट कामगिरी करणारा निर्देशांक बनला आहे. विद्यमान वर्षात जुलै २०२५ या काळात भारतातून एफआयआयने काढलेले ९५,६०० कोटी रुपये, म्हणजे निम्म्याहून अधिक आयटी कंपन्यांच्या शेअरमधून काढले आहेत. मात्र, म्युच्युअल फंडांनी उलट भूमिका बजावली आहे. देशांतर्गत संस्थांनी एका वर्षात टीसीएसचा बाजार हिस्सा ४.२५ टक्क्यांवरून ५.१३ टक्क्यांपर्यंत वाढवला आणि जुलैच्या आकडेवारीनुसार ४०० कोटी रुपयांचे नवीन म्युच्युअल फंड खरेदी झाली आहे.
या दरम्यान, मूल्यांकनांमध्ये झपाट्याने बदल झाले आले आहेत. टीसीएसचा मागील पीई ४१ वरून २० पर्यंत खाली आला आहे, पाच वर्षांचा नफा ८.५ टक्के आणि स्टॉक सीएजीआर ६ टक्के आहे. दीर्घकालीन आकडेवारीनुसार, आयटीने दोन दशकांत दरवर्षी १२.५ टक्के परतावा दिला आहे. परंतु गेल्या तीन ते पाच वर्षांत निफ्टीपेक्षा आयटी निर्देशांक आणि टीसीएसची कामगिरी निराशाजनक राहिली आहे.
निफ्टीमधील आयटीचे वजन हे दशकाच्या नीचांकी पातळीवर आहे. मूल्यांकन आणखी घसरल्यास हे क्षेत्र तुलनेने चांगली कामगिरी देऊ शकते, असे डीएसपी म्युच्युअल फंडने म्हटले आहे, त्यांनी आयटी, बँका आणि इतर लार्ज कॅप कंपन्यांच्या शेअरना अस्थिरतेवर मात करण्यासाठी उत्तम संधी असल्याचे म्हटले आहे.
टीसीएसने जगभरातील एकूण मनुष्यबळाच्या २ टक्के कर्मचारी कपातीची घोषणा केली आहे. यानुसार तब्बल १२ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले जाणार असल्याचे सांगण्यात आले होते. तसेच पगारवाढही रोखल्याची बातमी समोर आली होती. मात्र नोकर कपातीच्या घोषणेनंतर काही दिवसांनी टीसीएसकडून ८० टक्के कर्मचाऱ्यांचा पगार वाढीची घोषणा केली आहे.