मुंबईः ध्वनी आणि प्रकाशाच्या क्षेत्रात व्यावसायिकतेला भारतात उत्तुंग भविष्य असून, या क्षेत्रासाठी आवश्यक निपुण उत्पादनांचे भारत हे जागतिक निर्मिती केंद्र बनेल, असा विश्वास ‘पाम एव्ही-आयसीएन एक्सपो’ या प्रदर्शनाच्या २३ व्या आवृत्तीच्या गुरुवारी झालेल्या उद्घाटनांत व्यक्त करण्यात आला. प्रकाश आणि ध्वनी उपकरणांतील नाविन्याचे हे तीन दिवसांचे प्रदर्शन ३१ मे २०२५ पर्यंत गोरेगावस्थित नेस्को संकुलात सुरू आहे.

जागतिक नाविन्यता आणि देशांतर्गत महत्त्वाकांक्षेला जोडणाऱ्या प्रदर्शनांत ३०० हून अधिक प्रदर्शक आणि हजाराहून अधिक नाममुद्रा त्यांचे अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रदर्शित करत आहेत. २५,००० हून अधिक व्यावसायिक, इंटिग्रेटर आणि दृकश्राव्य, मनोरंजन तसेच प्रदर्शनीय प्रकाशाच्या क्षेत्रात कार्यरत निर्णयकर्ते या निमित्ताने एकत्र येणे अपेक्षित आहे. भारतात व्यावसायिक दृकश्राव्य साधनांची बाजारपेठ २०२५ मधील ६५० कोटी डॉलरवरून, २०३१ पर्यंत १२ टक्के चक्रवाढ दराने १,७३० कोटी डॉलरपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. एलईडी दिव्यांच्या विभागात विशेषतः मजबूत वाढ दिसून येत असून, ज्यातील उलाढाल २०२४ मधील ५०० कोटी डॉलरवरून, २०३३ पर्यंत १९.३५ टक्के चक्रवाढ दराने २,६७० कोटी डॉलरपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे, असे प्रदर्शनाचे आयोजक इन्फॉर्मा मार्केट्स इन इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक योगेश मुद्रास म्हणाले.