लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी
मुंबई : अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया बुधवारच्या सत्रात १५ पैशांनी सावरून ८७.७३ वर बंद झाला. डॉलरमधील अस्थिरता आणि रिझर्व्ह बँकेच्या व्याजदर स्थिर ठेवण्याच्या निर्णयामुळे रुपयाला बळ मिळाले आहे. त्या उलट अमेरिकी कराबाबत अनिश्चिततेने भांडवली बाजारात प्रचंड नकारात्मकता दिसून आली.
भारतीय चलन विक्रमी नीचांकी पातळीवरून सावरले आणि १५ पैशांनी वधारून प्रति डॉलर ८७.७३ पातळीवर बंद झाले. मात्र खनिज तेलाच्या वाढत्या किमती, देशांतर्गत शेअर बाजारातील घसरण आणि अमेरिकेच्या व्यापार शुल्कासंबंधाने टांगत्या तलवारीने रुपयातील वाढ मर्यादित राहिली, असे परकीय चलन व्यापाऱ्यांनी सांगितले. परकीय चलन बाजारात, रुपयाने ८७.७२ पातळीवरून व्यवहाराला सुरुवात केली आणि दिवसभरात ८७.६३ ते ८७.८० या श्रेणीत तो व्यवहार करत होता.
दुसरीकडे, मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स १६६.२६ अंशांनी घसरून ८०,५४३.९९ पातळीवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ७५.३५ अंशांनी घसरला आणि तो २४,५७४.२० पातळीवर बंद झाला. अमेरिकेशी सुरू असलेल्या व्यापार तणावानंतरही, देशांतर्गत बाजार तगून राहिला. निफ्टी २४,५०० च्या प्रमुख आधार पातळीजवळ स्थिर राहिला. औषध निर्माण क्षेत्राची कामगिरी कमकुवत राहिली, शुल्क वाढीच्या सर्वाधिक झळा या क्षेत्राला बसण्याची शक्यता आहे, असे जिओजित इन्व्हेस्टमेंट्सचे संशोधन प्रमुख विनोद नायर म्हणाले.
रिझर्व्ह बँकेने रेपो दरात बदल न केल्याने आणि मुख्यत: अमेरिकेला निर्यातीवर निर्भर असलेल्या माहिती-तंत्रज्ञान आणि आरोग्यसेवा क्षेत्रातील समभागांमध्ये विक्रीचा मारा झाला. शिवाय व्याजदर-संवेदनशील वाहन निर्माण, गृहनिर्माण आणि बँकांच्या समभागांमध्ये ५ टक्क्यांपर्यंत घसरण झाली.