मुंबई :जेन स्ट्रीटशी निगडित प्रकरणानंतर निर्माण झालेल्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर देखरेख यंत्रणा भक्कम करण्याचे पाऊल उचलण्यात येणार आहे, अशी माहिती भांडवली बाजार नियंत्रक संस्था सेबीचे अध्यक्ष तुहिन कांत पांडे यांनी सोमवारी दिली. जेन स्ट्रीट प्रकरण हे देखरेखीतील त्रुटीमुळे निर्माण झाले असून, त्यावर सेबी आणि भांडवली बाजारांकडून लक्ष ठेवण्यात येत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जेन स्ट्रीट ग्रुप समूहातील कंपन्यांना भारतीय भांडवली बाजारात व्यवहार करण्यावर सेबीने बंदी घातली आहे. याचबरोबर या कंपन्यांनी बेकायदा कमाविलेला ४,८४३ कोटी रुपयांचा नफाही जप्त कऱण्याचे निर्देश सेबीने दिले आहेत. या पार्श्वभूमीवर सेबीचे अध्यक्ष पांडे म्हणाले की, जेन स्ट्रीट प्रकरण हे प्रामुख्याने देखरेखीशी निगडित आहे. त्यावर सेबी आणि भांडवली बाजारांकडून लक्ष ठेवण्यात येत आहे. देखरेखीची यंत्रणा आणखी भक्कम करण्याच्या दिशेने पावले उचलण्यात आली आहे. या प्रकरणानंतर साप्ताहिक वायदे व्यवहारांतील गुंतवणूकदारांवर झालेल्या परिणामांचे मूल्यमापन सुरू आहे.
वायदे व्यवहारांबाबत पांडे म्हणाले की, सेबीकडून गेल्या तीन महिन्यांतील भांडवली बाजारातील व्यवहारांची श्वेतपत्रिका जाहीर केली जाणार आहे. त्यातून साप्ताहिक व मासिक कालावधीच्या वायदे व्यवहारांमधून गुंतवणूकदारांचा किती तोटा झाला, याची तुलनात्मक माहिती मिळण्याची शक्यता आहे. यात वयोगटानिहाय गुंतवणूकदारांवर झालेला परिणामही मांडला जाणार आहे. या श्वेतपत्रिकेच्या माध्यमातून बाजारातील चुकीच्या गोष्टी समजण्यास मदत होऊन त्यावर उपाययोजना करता येतील.
संचालक मंडळातील नियुक्त्या, त्यांचे वेतन, विलीनीकरण आणि कंपनीच्या कामकाजाशी निगडित इतर मुद्द्यांवर भागधारकांचे मत महत्त्वाचे असते. किरकोळ गुंतवणूकदारांना नेहमी मतदानाची ही प्रक्रिया आव्हानात्मक वाटते, मात्र किरकोळ गुंतवणूकदारांनी एकत्रितपणे घेतलेली भूमिका महत्त्वाची ठरू शकते.- तुहिन कांत पांडे, अध्यक्ष, सेबी
भागधारकांसाठी ई-मतदान प्रणाली
भारतातील दोन मुख्य रोखे भांडार असलेल्या – सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (सीडीएसएल) आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरीने (एनएसडीएल) त्यांच्या गुंतवणूकदार ॲपमध्ये नवीन पर्यायाची भर घातली आहे, ज्यामुळे भागधारकांना कंपनीसंबंधित महत्त्वाच्या निर्णयावर मतदान करताना निर्णय घेणे सोपे होणार आहे. हे वैशिष्ट्य आता सीडीएसएलच्या MyEasi ॲप आणि एनएसडीएलच्या Speed-e ॲपवर उपलब्ध आहे. भांडवली बाजार नियामक सेबीचे अध्यक्ष तुहिन कांता पांडे यांनी ई-मतदान प्रणालीचे उद्घाटन केले.
ई-मतदान प्रणालीमुळे कंपन्यांच्या बैठकींमध्ये भागधारकांचा सहभाग वाढून अधिक पारदर्शकता निर्माण होईल. या पर्यायामुळे भागधारक आता कंपन्यांच्या विविध निर्णयांवर तज्ज्ञांचा सल्ला पाहू शकतात. विविध कंपन्यांच्या संकेतस्थळांना भेटी न देता भागधारक एकाच ठिकाणी अचूक माहिती मिळवू शकतील. शिवाय त्यांना कंपन्यांशीसंबंधित निर्णयावर मतदान करणे सोपे होणार आहे. यावेळी एनएसडीएलचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्याधिकारी विजय चांडोक आणि सीडीएसएलचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्याधिकारी नेहल व्होरा उपस्थित होते.