वृत्तसंस्था, नवी दिल्ली
शिक्षण तंत्रज्ञान क्षेत्रातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी कंपनी असलेल्या ‘अनॲकॅडमी’ने मनुष्यबळात आणखी १२ टक्क्यांची कपात केल्याचे गुरुवारी जाहीर केले. यातून सुमारे ३८० कर्मचाऱ्यांना नारळ दिला गेला असून, कंपनीकडून झालेली ही चौथी कर्मचारी कपात आहे.




जपानच्या ‘सॉफ्टबँके’चे आर्थिक पाठबळ लाभलेला नवउद्यमी उपक्रमांमध्ये ‘अनॲकॅडमी’चा समावेश होतो. तिची गणना यशाचा महत्त्वपूर्ण टप्पा गाठणाऱ्या ‘युनिकॉर्न’मध्ये (एक अब्ज डॉलरहून अधिक मूल्य) होते. कंपनीने मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात ३५० कर्मचाऱ्यांची कपात केली होती. आता कंपनीने चौथी १२ टक्क्यांची म्हणजेच सुमारे ३८० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर कुऱ्हाड चालविली आहे.
कंपनीचे सहसंस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव मुंजाळ यांनी कर्मचाऱ्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, आपला मुख्य व्यवसाय नफादायी राहावा, यासाठी कंपनी योग्य दिशेने पावले उचलत आहे. आपल्याला आणखी पुढे वाटचाल करावयाची आहे. याच वेळी दुर्दैवाने मला आणखी एक अवघड निर्णय घ्यावा लागत आहे. मनुष्यबळात १२ टक्के कपात करीत आहोत. यातून सद्य:स्थितीत असलेल्या अडचणींवर मात करून आपण आपले उद्दिष्ट गाठण्यात यशस्वी होऊ, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.