पीटीआय, नवी दिल्ली

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) मंगळवारी (८ जुलै) ९७ टक्के सदस्यांच्या पीएफ खात्यांमध्ये २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी ८.२५ टक्के दराने व्याज जमा केले, अशी माहिती केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडवीया यांनी दिली.

यंदा ईपीएफओ सदस्यांच्या खात्यात व्याज जमा करण्याची प्रक्रिया तुलनेत लवकर पूर्ण करण्यात आली. यामुळे जूनमध्येच सुमारे ३२.३९ कोटींहून अधिक सदस्यांच्या खात्यात व्याज जमा करण्यात आले. गेल्या वर्षी, आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी, सदस्यांच्या खात्यात व्याज जमा करण्याची प्रक्रिया ऑगस्ट महिन्यात सुरू झाली आणि डिसेंबरमध्ये व्याज जमा केले गेले होते, अशी माहिती मांडवीया यांनी दिली.

आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी, १३.८८ लाख आस्थापनांमधील ३३.५६ कोटी सदस्य खात्यांचे वार्षिक खाते अद्यतन आवश्यक होते. त्यापैकी ८ जुलैपर्यंत अद्यतन पूर्ण झालेल्या १३.८६ लाख आस्थापनांमधील ३२.३९ कोटी खात्यांमध्ये व्याज जमा झाले आहे. उर्वरित सदस्यांच्या खात्यांमध्ये देखील येत्या आठवड्यात व्याज जमा केले जाणे अपेक्षित आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवर (ईपीएफ) ८.२५ टक्के व्याजदरावर केंद्र सरकारने २२ मे रोजी शिक्कामोर्तब केले आहे. अनेक निश्चित उत्पन्न देणाऱ्या साधनांच्या तुलनेत, ईपीएफ तुलनेने जास्त आणि स्थिर परतावा देते, ज्यामुळे निवृत्तीनंतरच्या बचतीवर स्थिर वाढ होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फेब्रुवारी २०२४ मध्ये, ईपीएफओने २०२३-२४ साठी व्याजदर किरकोळ वाढवून ८.२५ टक्के केला होता. त्याआधीच्या वर्षात म्हणजेच मार्च २०२२-२३ (एप्रिल २०२२ ते मार्च २०२३) मध्ये हा व्याजदर ८.१५ टक्के असा वाढविण्यात आला होता. तर त्याआधीच्या वर्षात (२०२१-२२) तो ८.५ टक्क्यांवरून त्यात थेट ०.४० टक्क्यांची कपात करत, ८.१० टक्के असा चार दशकांतील नीचांकी पातळीवर आणला गेला होता. याआधी १९७७-७८ मध्ये कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवरील व्याजदर ८ टक्क्यांच्या नीचांक पातळीवर होता.