वृत्तसंस्था, लंडन : ब्रिटनमधील आघाडीची दूरसंचार कंपनी बीटी समूहाकडून सुमारे ५५ हजार कर्मचाऱ्यांना नारळ दिला जाणार आहे. या दशकाच्या अखेरपर्यंत कंपनी टप्प्याटप्प्याने ही कपात लागू करणार असल्याचे गुरुवारी स्पष्ट झाले.

मागील काही काळापासून तंत्रज्ञान आणि दूरसंचार क्षेत्रातील कंपन्यांकडून कपातीचे सत्र सुरू आहे. आर्थिक मंदीचे सावट आणि वाढती महागाई यामुळे कंपन्यांकडून हे पाऊल उचलले जात आहे. आता बीटी समूहाने खर्चात कपात करण्यासाठी मनुष्यबळ कपातीचा निर्णय घेतला आहे. कंपनीत सध्या १ लाख ३० हजार कर्मचारी कार्यरत आहेत. यात कंपनीसह कंत्राटदारांच्या कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. कंपनीने २०३० पर्यंत कर्मचारी संख्या ७५ हजार ते ९० हजारांदरम्यान आणण्याचे जाहीर केले आहे.

बीटी समूहाने कमी मनुष्यबळात काम करण्याचा निर्णय घेतला आहे. यातून खर्चात मोठी कपात करण्याचे नियोजन आहे. नवीन बीटी समूह हा कमी कर्मचारी असलेला आणि उज्ज्वल भविष्य असलेला असेल, असे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी फिलिप जान्सेन म्हणाले. बीटी ही आधी ब्रिटिश टेलिकॉम या नावाने ओळखली जात होती. फायबर ऑप्टिक ब्रॉडबँड आणि ५ जी मोबाइल नेटवर्क पूर्णपणे सुरू झाल्यानंतर जास्त मनुष्यबळाची आवश्यकता भासणार नाही, अशी कंपनीची भूमिका आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दूरसंचार क्षेत्रातील ब्रिटिश कंपनी व्होडाफोनच्या नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी मार्गरिटा डेला व्हॅले यांनीदेखील कंपनीच्या वाढीसाठी कृती आराखडा योजला असून, त्यानुसार मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात केली जाणार असल्याचे सूतोवाच केले आहे. कंपनीच्या रचनेत सुटसुटीतपणा आणण्यासाठी पुढील तीन वर्षांत तब्बल ११ हजार कर्मचाऱ्यांची कपात केली जाण्याची त्यांनी घोषणा केली आहे.