पीटीआय, नवी दिल्ली
अॅपलने भारतातील निर्मितीत कपात करावी, अशी सूचना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कंपनीचे मुख्याधिकारी टिम कूक यांनी केली आहे. खुद्द ट्रम्प यांनीच हे जाहीर केले आहे. या पार्श्वभूमीवर भारतातील गुंतवणूक कमी होणार नसल्याचे अॅपलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हवाल्याने सरकारी सूत्रांनी म्हटले आहे.

ट्रम्प यांनी म्हटले आहे की, मी अॅपलचे मुख्याधिकारी टिम कूक यांच्याशी चर्चा केली आहे. त्यांनी भारतात उत्पादनांची निर्मिती करण्याऐवजी अमेरिकेत करावी, अशी सूचना मी केली आहे. टिम हे माझे मित्र आहेत. त्यांना मी चांगली वागणूक दिली आहे. परंतु, ते आता भारतात निर्मिती क्षमता वाढवत असल्याचे समोर येत आहे. भारत स्वत:ची काळजी घेऊ शकतो. माझ्या सूचनेनंतर आता अॅपलकडून अमेरिकेत निर्मिती क्षमतेत वाढ करण्यात येणार आहे.

ट्रम्प यांनी अॅपलला भारतातील उत्पादनात कपात करण्याची सूचना केल्यानंतर केंद्र सरकारच्या पातळीवर हालचालींना वेग आला. सरकारच्या वतीने तातडीने कूपरटिनोतील अॅपलच्या मुख्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. भारतातील गुंतवणुकीची योजना कायम असून, देशात मोठी निर्मिती सुविधा उभारण्याचा प्रस्ताव असल्याची हमी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिल्याचे सरकारी सूत्रांनी म्हटले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारतातून १.५ लाख कोटींच्या आयफोनची निर्यात

अॅपल कंपनीकडून भारतात आयफोनचे उत्पादन केले जाते. जगभरातील एकूण आयफोन उत्पादनापैकी १५ टक्के भारतात होते. कंपनीने गेल्या आर्थिक वर्षात १.५ लाख कोटी रुपयांच्या आयफोनची निर्यात केल्याची घोषणा केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एप्रिल महिन्यात केली होती. अॅपल ही देशातील सर्वांत जास्त रोजगार निर्माण करणाऱ्या कंपन्यांपैकी एक आहे. कंपनीने देशभरात सुमारे २ लाख जणांना रोजगार दिलेला आहे.