मुंबईः सध्या जागतिक स्तरावर परिस्थिती खूपच अस्थिर असून, राष्ट्रा-राष्ट्रांतील संबंध हे सहकार्यापासून गतिरोधाकडे वळताना दिसत आहेत आणि त्यातच भारतीय निर्यातीवर ५० टक्के अमेरिकी शुल्काचा विपरित परिणाम होण्याची भीती देखील व्यक्त करण्यात येत आहे. तथापि य़ाचे परिणाम हे तात्पुरते असतील आणि भीतीचे कारण नसल्याची ग्वाही देशाचे मुख्य आर्थिक सल्लागारांनी बुधवारी नवी दिल्लीत दिली.
अमेरिकेने वाढवलेल्या आयात शुल्काशी संबंधित आव्हाने तात्पुरती असून, त्यांचा परिणाम सहा महिन्यांपुरताच टिकेल. देशाची अर्थव्यवस्था या आणि इतर दीर्घकालीन आव्हानांमधून वेगाने मार्गक्रमण करेल, असा आशावाद मुख्य आर्थिक सल्लागार व्ही. अनंत नागेश्वरन यांनी व्यक्त केला.
रत्न आणि आभूषणे, कोळंबी आणि कापड यासारख्या क्षेत्रांना सुरुवातीला फटका बसणार आहे. त्यासंदर्भातील आव्हाने नक्कीच मोठे आहे. मात्र इतर क्षेत्रांवर थेट परिणाम होण्याची शक्यता कमी आहे. केंद्र सरकारला परिस्थितीची जाणीव असून प्रभावित क्षेत्रांतील घटकांशी आधीच चर्चा सुरू झाली आहे, असे नागेश्वरन यांनी स्पष्ट केले.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यातील अलास्का येथे होणाऱ्या बैठकीच्या निर्णयावर बरेच निर्णय अवलंबून असेल. शिवाय अमेरिकेचे अधिकारी या महिन्याच्या अखेरीस व्यापार करारासंबंधित वाटाघाटींसाठी भारताच्या दौऱ्यावर येतील की नाही याबद्दलही लवकरच स्पष्टता येईल. मात्र भारत-अमेरिकेतील व्यापार वाटाघाटींसंबंधाने अन्य कोणताही तपशील देण्यास नागेश्वरन यांनी नकार दिला.
नागेश्वरन यांच्या मते, भारतीय अर्थव्यवस्थेवर अल्पावधीसाठी काही परिणाम निश्चितच दिसून येतील.
अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर उच्च आयात कर लादण्याचा निर्णय घेणे हे मोठे धक्कादायक आहे, पण त्यामागे नेमके कारण काय हे सांगता येणे अवघड आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि त्यानंतरच्या घडामोडींचा हा परिणाम आहे की त्यांच्या आणखी काही डावपेचांचा तो भाग आहे असे काही प्रश्न आहेत, जे अनुत्तरीत आहेत.
कराशी संबंधित मुद्द्यांवर आपले सध्या संपूर्ण लक्ष केंद्रित झाले आहे, परंतु कृत्रिम बुद्धिमत्तेचा व्यवसाय-रोजगारावरील परिणाम, महत्त्वाच्या खनिजांसाठी एका देशावर अवलंबित्व आणि पर्यायी प्रक्रिया आणि पुरवठा साखळी मजबूत करणे यासारख्या अधिक महत्त्वाच्या आव्हानांकडेही आपल्याला लक्ष द्यावे लागेल, असे नागेश्वरन यांनी नमूद केले.
येत्या काही वर्षांत आपल्याला तोंड द्यावे लागणारी मोठी आव्हाने पाहता, खासगी क्षेत्राने आगामी एक-दोन तिमाहीपेक्षा, अधिक दीर्घ पल्ल्याचा विचार करावा लागेल. सध्या तोंड द्यावे लागत असलेल्या समस्यांपेक्षा आणखी नवीन आव्हानांसाठी सज्जता करावी लागू शकते, असे त्यांनी भारतीय कंपन्यांना दिलेल्या संदेशात म्हटले आहे.
तरुणांना आरोग्याकडे लक्ष देण्याचे आवाहन
भारतीय तरुणांनी स्क्रीनचा अतिरेकी वापर, तयार पिशवीबंद आणि प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ (अल्ट्रा प्रोसेस्ड फूड) टाळून उद्भवणाऱ्या शारीरिक आणि आरोग्यविषयक समस्यांकडे लक्ष दिले पाहिजे. या समस्यांमुळे लोकांमध्ये चिंता आणि आत्महत्येचे विचारही येत आहेत, असे नागेरेश्वरन यांनी सांगितले. आव्हानाचा सामना करण्यासाठी खासगी क्षेत्राने मदत करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.