पुणे : किर्लोस्कर इंडस्ट्रीज लिमिटेडच्या (केआयएल) संचालक मंडळाने जॉर्ज वर्गीस यांची व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यास मंगळवारी मान्यता दिली. ही नियुक्ती पाच वर्षांच्या कालावधीसाठी करण्यात आली आहे.
वर्गीस यांनी आधी डेल, रिलायन्स कम्युनिकेशन्स आणि कमिन्स सारख्या कंपन्यांमध्ये २० वर्षांहून अधिक काळ विविध पदांवर काम केले आहे. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी व्यवसाय संचालन, मनुष्यबळ, व्यवसाय धोरण, विपणन आणि ब्रँडिंग यासह विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. वर्गीस हे एप्रिल २०२१ मध्ये किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीजमध्ये मनुष्यबळ विभागाचे समूह उपाध्यक्ष म्हणून रुजू झाले. त्यानंतर ते किर्लोस्कर ऑइल इंजिन्स लिमिटेडचे मुख्य मनुष्यबळ अधिकारी बनले. याबाबत कंपनीच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष अतुल किर्लोस्कर म्हणाले की, जॉर्ज वर्गीस यांनी समूहातील विविध कंपन्यांसोबत काम केले आहे. त्यांना व्यवसाय धोरण, नेतृत्व, मनुष्यबळ, विपणन या विभागांचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांच्या अनुभवाचा कंपनीला फायदा होईल.