नवी दिल्ली : भांडवली बाजार नियामक ‘सेबी’ने व्हिडीओकॉन समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी वेणुगोपाल धूत यांच्यासह इतर दोघांना १ कोटी रुपयांची नोटीस बजावली आहे. व्हिडीओकॉन इंडस्ट्रीजच्या समभागांमध्ये इनसाइडर ट्रेडिंगचे बेकायदेशीर प्रकार घडल्याने १.०३ कोटी रुपये भरण्यास त्यांना मंगळवारी फर्मावण्यात आले.

हेही वाचा >>> ‘आयपीओं’चा महापूर; एका दिवसात १३ कंपन्यांकडून ‘सेबी’कडे अर्ज

नोटीस बजावल्यापासून १५ दिवसांच्या आत रक्कम न भरल्यास धूत यांना अटक करण्याचा सेबीने इशारा दिला आहे. बरोबरीने त्यांची बँक खाती मालमत्ता गोठवण्यात येईल, असे सांगितले आहे. धूत यांच्या व्यतिरिक्त, इलेक्ट्रोपार्ट्स (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड आणि व्हिडीओकॉन रिॲल्टी आणि इन्फ्रास्ट्रक्चर्स या इतर दोन संस्थांनादेखील नोटीस पाठवण्यात आली आहे. धूत यांच्यासह या संस्थांनी सप्टेंबर २०२१ मध्ये सेबीने बजावलेला दंड भरण्यात अयशस्वी झाल्यानंतर ही नोटीस बजावण्यात आली. सप्टेंबर २०२१ मध्ये, सेबीने धूत यांना व्हिडीओकॉन इंडस्ट्रीजच्या समभागातील इनसाइडर ट्रेडिंगसाठी एकूण ७५ लाख रुपयांचा दंड ठोठावला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रकरण काय?

व्हिडीओकॉन रिॲल्टी आणि इन्फ्रास्ट्रक्चर्स, इलेक्ट्रोपार्ट्स (इंडिया) आणि धूत यांनी समभागांच्या किमतीसंदर्भातील संवेदनशील माहिती असताना बाजारात या समभागांचे व्यवहार केले. देना बँकेने व्हिडीओकॉनचे कर्ज खाते ‘एनपीए’ म्हणून वर्ग करण्यासंदर्भातील माहितीचा कंपनीच्या समभागांच्या किमतींवर प्रत्यक्ष परिणाम होण्याची शक्यता होती. याचा फायदा त्यावेळी घेतला गेल्याचे सेबीने म्हटले आहे. एप्रिल-सप्टेंबर २०१७ दरम्यान व्हिडीओकॉनच्या समभागांमध्ये इनसाइडर ट्रेडिंग झाल्याची माहिती नियामकांकडे आहे.