मुंबई: कामधेनू या प्रसिद्ध नाममुद्रेअंतर्गत विक्री होत असलेल्या पोलादी सळयांची (टीएमटी बार) उत्पादक व्हीएमएस टीएमटी लिमिटेडने प्रारंभिक समभाग विक्री (आयपीओ) प्रस्तावित केली असून, प्रति समभाग ९४ रुपये ते ९९ रुपयांचा किंमत पट्टा निश्चित केला आहे. हा आयपीओ बुधवार, १७ सप्टेंबरला खुला होईल आणि शुक्रवार, १९ सप्टेंबरला बंद होईल.
मुंबई तसेच राष्ट्रीय शेअर बाजारात (बीएसई व एनएसई) समभागांच्या सूचिबद्धतेसाठी असलेल्या या आयपीओतून कंपनीला ११५ कोटी रुपये उभारले जाणे अपेक्षित आहे. अरिहंत कॅपिटल मार्केट्स लिमिटेड ही या आयपीओची प्रधान व्यवस्थापक आहे. व्हीएमएस टीएमटी लिमिटेड या आयपीओमधून मिळालेल्या निधीतून आंशिक स्वरूपात कर्जांची परतफेड करणार आहे.
गुजरातमधील अहमदाबाद, येथे कंपनीच्या उत्पादन सुविधेत टीएमटी बारची निर्मिती केली जाते आणि या प्रकल्पाची एकूण वार्षिक स्थापित क्षमता २००,००० मेट्रिक टन आहे. ३१ जुलै २०२५ पर्यंत कंपनीकडे तीन वितरक आणि २२७ डीलर्सचा समावेश असलेले वितरण जाळे आहे. कंपनीकडे ५० हून अधिक ट्रक आहेत जे किरकोळ ग्राहकांना टीएमटी बार त्यांच्या दारापर्यंत पोहचते करण्यास वापरात येतात.
कंपनीच्या विक्रीचे लक्ष हे महानगरांबाहेरील, द्वितीय आणि तृतीय श्रेणी शहरांवर केंद्रित आहे. २,१६,००० मेट्रिक टन बिलेट उत्पादन क्षमतेसह एकात्मिक निर्माणात ती आहे. शिवाय स्वतःचा १५ मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्प देखील उभारत आहे. ज्यामुळे उत्पादन खर्चात कपातीसह स्पर्धात्मक वर्चस्वाचाही तिचा प्रयत्न आहे. गुणवत्ता, सुरक्षितता आणि पर्यावरणीय जबाबदारी याबद्दल कंपनीच्या वचनबद्धतेला अधोरेखित करणारे अनेक आयएसओ मानांकनही तिने मिळविली आहेत.
आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी व्हीएमएस टीएमटीने ७७०.१९ कोटी रुपयांचा महसूल कामकाजातून कमावला आणि २०२३-२४ मधील नोंदविलेला १३.४६ कोटी रुपयांचा करपश्चात नफा आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये १४.७४ कोटी रुपयांवर नेला आहे. ३० जून २०२५ रोजी समाप्त तिमाहीत कंपनीचा महसूल आणि करपश्चात नफा अनुक्रमे २१२.२६ कोटी रुपये आणि ८.५८ कोटी रुपये होता.