मुंबई : व्होडाफोन आयडिया लिमिटेडची सार्वजनिक समभाग विक्री (एफपीओ) सुरू होण्याआधी तिने सुकाणू गुंतवणूकदारांकडून मोठा प्रतिसाद मिळविला आहे. कंपनीने ७४ सुकाणू गुंतवणूकदारांकडून (अँकर इन्व्हेस्टर) ५,४०० कोटी रुपयांची उभारणी केली आहे. या गुंतवणूकदारांमध्ये जीक्यूजी पार्टनर्स, द मास्टर ट्रस्ट बँक ऑफ जपान, यूबीएस, मॉर्गन स्टॅन्ले इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट, सिटीग्रुप ग्लोबल मार्केट्स, ऑस्ट्रेलियन सुपर, फिडेलिटी, क्वांट आणि मोतीलाल ओसवाल यांचा समावेश आहे.
व्होडा-आयडियाने ११ रुपये प्रति शेअर या दराने सुकाणू गुंतवणूकदारांना ४९१ कोटी शेअरचे वाटप केले. शेअरची सर्वाधिक संख्या म्हणजेच सुकाणू गुंतवणूकदारांना वाटप केलेल्या एकूण शेअरपैकी २६ टक्के अमेरिकेतील जीक्यूजी पार्टनर्सला दिले आहेत. या शेअरचे मूल्य १,३४५ कोटी रुपये आहे. फिडेलिटी इन्व्हेस्टमेंटने या भागविक्रीमध्ये (एफपीओ) सुमारे ७७३ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. तर ट्रू कॅपिटल आणि ऑस्ट्रेलियन सुपरदेखील अनुक्रमे ३३१ कोटी आणि १३० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. सुकाणू गुंतवणूकदारांसाठी राखीव असलेल्या भागापैकी ८७४ कोटी रुपये मूल्याचे म्हणजेच सुमारे १६.२ समभाग पाच देशांतर्गत म्युच्युअल फंडांनी खरेदी केले आहेत. ज्यामध्ये मोतीलाल ओसवाल मिडकॅप फंडाने ५०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. याशिवाय एचडीएफसी म्युच्युअल फंड, एसबीआय जनरल इन्शुरन्स आणि क्वांट म्युच्युअल फंडासह देशांतर्गत गुंतवणूकदारांना समभाग वाटप करण्यात आले.
हेही वाचा… आयआयएफएल फायनान्स हक्कभाग विक्रीद्वारे १,२७२ कोटी रुपये उभारणार
व्होडाफोन-आयडिया लिमिटेडने फॉलो-ऑन समभाग विक्रीसाठी (एफपीओ) प्रति समभाग १० ते ११ रुपये किमतीपट्टा निश्चित केला आहे. ही समभाग विक्री १८ एप्रिलपासून सुरू झाली असून, २२ एप्रिलपर्यंत सुरू राहील. शुक्रवारी कंपनीच्या एफपीओच्या घोषणेच्या परिणामी व्होडाफोन-आयडियाचा समभाग १२.९५ रुपयांवर दिवसअखेर स्थिरावला होता. त्या तुलनेत प्रत्येकी १० रुपये ते ११ रुपये निश्चित करण्यात आलेली विक्री किंमत ही गुंतवणूकदारांना १५ टक्के सूट देणारी आहे. याआधी २०२० मध्ये येस बँकेने एफपीओच्या माध्यमातून १५,००० कोटी रुपयांची निधी उभारणी केली होती.
हेही वाचा… अदानी समूहाची अंबुजा सिमेंटमध्ये ८,३३९ कोटींची गुंतवणूक
तिसरी मोठी निधी उभारणी
डिजिटल वित्तीय सेवा क्षेत्रातील ‘पेटीएम’ने याआधी सुकाणू गुंतवणूकदारांकडून ८,२३५ कोटींची सर्वात मोठी निधी उभारणी केली होती. तर भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसीने सुकाणू गुंतवणूकदारांकडून ५,६२७ कोटींचा निधी उभारला होता. आता व्होडा-आयडियाकडून केलेली ही तिसरी सर्वात मोठी निधी उभारणी असेल.