मुंबई : केंद्र सरकारच्या मालकीच्या इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी अर्थात ‘इरेडा’च्या समभागाने बुधवारी भांडवली बाजारात दमदार पाऊल टाकले. सार्वजनिक प्रारंभिक विक्रीद्वारे प्रत्येकी ३२ रुपये किमतीला मिळालेल्या या समभागाने बुधवारी बाजारात सूचिबद्धतेला ५६ टक्के अधिमू्ल्यासह म्हणजेच ५० रुपयांच्या किमतीवर व्यवहार सुरू केले. समभाग मिळविण्यास यशस्वी ठरलेल्या गुंतवणूकदारांना त्याने दिवसअखेरपर्यंत ८७.५ टक्क्यांचा लाभही दाखविला.
राष्ट्रीय शेअर बाजारात ‘इरेडा’चा समभाग ५६.२५ टक्क्यांच्या अधिमूल्यासह सूचिबद्ध झाला आणि दिवसअखेर उच्चांकी झेप घेत ६० रुपयांच्या पातळीवर स्थिरावला. सत्रातील व्यवहारात तो ६० रुपयांपर्यंत झेपावला. तर त्याने ४९.९९ रुपये हा दिवसाचा तळही गाठला. दिवसअखेर समभाग ८७.५० टक्क्य़ांनी म्हणजेच २८ रुपयांनी उंचावत ६० रुपयांवर स्थिरावला. दिवसअखेर ‘इरेडा’चे बाजारभांडवल १६,१२६ कोटी रुपयांवर पोहोचले.
हेही वाचा…. मुंबई शेअर बाजाराचा ऐतिहासिक टप्पा, बाजार भांडवल ४ लाख कोटी डॉलरपुढे
‘इरेडा’चा ‘आयपीओ’ २१ नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबरदरम्यान गुंतवणुकीस खुला होता. प्रत्येकी ३० ते ३२ रुपये किमतीला झालेल्या या भागविक्रीला गुंतवणूकदारांनी ३८.८० पटीने अधिक भरणा करून उमदा प्रतिसाद दिला होता.
समभागांचे करावे काय : तज्ज्ञ काय म्हणतात?
‘इरेडा’च्या समभागाने बाजारात जोरदार पदार्पण केले असून टाटा टेकचे समभाग देखील चांगले अधिमूल्य मिळवून देतील अशी आशा आहे. दीर्घकालीन गुंतवणूकदारांच्या दृष्टिकोनातून या दोन्ही कंपन्यांच्या समभागांमध्ये अधिक चांगल्या नफ्यासाठी गुंतवणूक कायम राखली जायला हवी. – गौरांग शहा, वरिष्ठ उपाध्यक्ष, जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेस
हेही वाचा… ‘टाटा टेक’च्या पदार्पणाकडे नजरा, सूचिबद्धतेआधीच टाटा मोटर्सचा ऐतिहासिक उच्चांक
आयपीओच्या माध्यमातून समभाग मिळविलेल्या सर्व गुंतवणूकदारांनी दीर्घ मुदतीसाठी समभाग पोर्टफोलिओमध्ये ठेवण्याची शिफारस मी करतो, तर ज्यांना आयपीओच्या माध्यमातून समभाग मिळालेले नाहीत त्यांनी निराश न होता प्रत्येक घसरणीत दीर्घकालीन उद्देशाने टप्प्याटप्प्याने खरेदी करावी. – प्रशांत तपासे, संशोधन विश्लेषक, मेहता इक्विटीज