पीटीआय, नवी दिल्ली
घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाईचा दर सरलेल्या मे महिन्यात ०.३९ टक्के नोंदविण्यात आला. मुख्यत: खाद्यवस्तू आणि इंधनाच्या किमतीत घसरण झाल्याने हा दर १४ महिन्यांतील नीचांकी स्तरावर घसरला आहे. दरम्यान, जागतिक पातळीवर भू-राजकीय तणाव वाढल्याने महागाईत वाढ होण्याची भीती आहे.
घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित घाऊक महागाई दर आधीच्या एप्रिलमध्ये ०.८५ टक्के, तर गेल्या वर्षी मेमध्ये २.७४ टक्के होता. यंदाच्या मे महिन्यात खाद्यवस्तूंच्या किमतीत वार्षिक तुलनेत १.५६ टक्क्यांनी घसरण झाली. याचवेळी भाज्यांच्या किमतीत २१.६२ टक्के घट झाली. गेल्या महिन्यात भाज्या, कांदा, टोमॅटो आणि डाळींच्या किमतीत घसरण झाली आहे. इंधन व ऊर्जा क्षेत्रातील महागाईतही २.२७ टक्के घट झाली आहे. या उलट उत्पादित वस्तूंच्या महागाईत मात्र २.०४ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे.
सरकारने गेल्या आठवड्यात जाहीर केलेल्या किरकोळ महागाई दराने सहा वर्षांतील नीचांकी पातळी नोंदविल्याचे आढळून आले. मे महिन्यांत किरकोळ महागाईचा दर २.८२ टक्के नोंदविला गेला, त्यासाठीही खाद्यवस्तूंच्या किमतीत झालेली घसरण मुख्यत्वे कारणीभूत ठरली. रिझर्व्ह बँकेनेही चालू आर्थिक वर्षासाठी किरकोळ महागाईचा अंदाज ४ टक्क्यांवरून कमी करून ३.७ टक्क्यांवर आणला आहे. महागाईचा ताण कमी झाल्या कारणानेच मध्यवर्ती बँकेने विकासाला पूरक थेट अर्धा टक्क्यांची कपातही गेल्या आठवड्यात केली आहे.
महागाईत वाढीची शक्यता
मोसमी पावसाने जूनच्या सुरूवातीला विश्रांती घेतली होती. यामुळे १५ जूनपर्यंतच्या पाऊस सरासरीपेक्षा ३१ टक्के कमी होता. याबाबत ‘इक्रा’चे वरिष्ठ अर्थतज्ज्ञ राहुल अगरवाल म्हणाले की, मोसमी पावसातील या बदलामुळे पिकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे खाद्यवस्तूंची महागाई वाढू शकते. इस्रायल आणि इराणधील युद्धाच्या तणावामुळे खनिज तेलाच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. १ ते १३ जून दरम्यान ब्रेंट क्रूडच्या किमतीत ४.३ टक्क्यांची तीव्र वाढ झाली आहे. तापलेले तेल आणि डॉलरच्या तुलनेत रुपयात होणारी घसरण यामुळे जूनमध्ये घाऊक महागाईत वाढीची शक्यता अगरवाल यांनी व्यक्त केली आहे.