नवी दिल्ली: इंधन आणि ऊर्जा वगळता सर्वच क्षेत्रात झालेली किंमत वाढ त्याचप्रमाणे गेल्या काही महिन्यांत खाद्यवस्तूंच्या किमतीतील उताराने पुन्हा उलट्या दिशेने घेतलेले वळण हे भारतात संथावत असलेला महागाई दरात वाढीस कारणीभूत ठरताना दिसत आहेत. गेल्या आठवड्यात ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारीत किरकोळ महागाई दर ऑगस्टमध्ये वाढून २.०७ टक्क्यांवर पोहोचल्याचे दिसले, तर सोमवारी झालेल्या घाऊक महागाईच्या आकड्याने चार महिन्यांपूर्वी मागे सोडलेली पातळी पुन्हा धारण केल्याचे आढळून आले.
घाऊक महागाई दर ऑगस्टमध्ये ०.५२ टक्के अशा चार महिन्यांतील उच्चांकी पातळीवर नोंदविला गेल्याचे सोमवारी अधिकृत आकडेवारीने दाखवून दिले. खाद्यवस्तू आणि उत्पादित वस्तूंच्या किमतीतील वाढ यासाठी कारणीभूत ठरली आहे.
घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित घाऊक महागाईच्या दरात गेल्या दोन महिन्यांपासून घसरण सुरू होती. हा दर जूनमध्ये उणे ०.१९ आणि जुलैमध्ये उणे ०.५८ टक्के होता. आता ऑगस्ट महिन्यात सकारात्मक पातळीवर वळण घेत त्याने शून्याच्या वर डोके काढले आहे. सरलेल्या एप्रिलमध्ये घाऊक महागाईचा दर ०.८५ टक्के पातळीवर होता, त्या खालोखाल दर ऑगस्टमध्ये नोंदविला गेला आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये घाऊक महागाईचा दर १.२५ टक्के पातळीवर होता.
उत्पादित वस्तूंच्या किमतीत गेल्या महिन्यात २.५५ टक्के वाढ झाली. त्याआधीच्या महिन्यात ती २.०५ टक्के होती. इंधन व ऊर्जा उत्पादनांच्या किमतीत जुलै महिन्यात २.४३ टक्के घसरण झाली होती. ती ऑगस्टमध्ये वाढून ३.१७ टक्क्यांवर आली. घाऊक महागाई दरात ऑगस्टमध्ये झालेली वाढ ही प्रामुख्याने खाद्यवस्तू, उत्पादित वस्तू आणि बिगरखाद्य वस्तू, बिगरखनिज उत्पादने आणि वाहतूक उपकरणे यांच्या किमती वधारल्यामुळे आहे, असे उद्योग मंत्रालयाने म्हटले आहे.
आगामी महिन्यांमध्ये किंमतवाढीचे कयास
भाज्या, कपडे, रबर आणि प्लास्टिक उत्पादनांची महागाई जास्त असल्याने घाऊक महागाईत वाढ झालेली आहे. सरकारकडून वस्तू व सेवा कर अर्थात जीएसटीतील सुधारणांना गती दिली जात असल्याने आगामी काळात घाऊक महागाईचा दर मध्यम राहण्याची शक्यता आहे, असे पीएचडीसीसीआय चेंबरचे अध्यक्ष हेमंत जैन म्हणाले. इंधन व ऊर्जा वगळता सर्वच क्षेत्रात किमती वाढल्या आहेत. यामुळे घाऊक महागाईचा दर सप्टेंबर महिन्यात ०.९ टक्के असा सहा महिन्यांतील उच्चांकी पातळीवर जाण्याचा अंदाज आहे. जागतिक पातळीवर खनिज तेलाच्या भावातील वाढ आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन याचा परिणाम महागाईवर होणार आहे, असे ‘इक्रा’चे वरिष्ठ अर्थतज्ज्ञ, राहुल अग्रवाल यांनी मत नोंदविले.