पीटीआय, नवी दिल्ली
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या विप्रोला मार्चअखेर सरलेल्या चैथ्या तिमाहीत ३,५६९.६ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात २५.९ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

गेल्या वर्षीच्या याच कालावधीत कंपनीने २,८३४.६ कोटी रुपयांचा नफा नोंदवला होता. यादरम्यान कंपनीचा महसूल २२,५०४.२ कोटी रुपयांवर पोहोचला आहे, जो गेल्या वर्षी याच तिमाहीतील २२,२०८.३ कोटी रुपयांवरून १.३३ टक्क्यांनी वाढला आहे. संपूर्ण आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये, नफ्यात १८.९ टक्क्यांनी वाढ होऊन तो १३,१३५.४ कोटी रुपये झाला. मात्र सरलेल्या आर्थिक वर्षात महसूल ०.७४ टक्क्यांनी घसरून ८९,०८८.४ कोटी रुपयांवर पोहोचला आहे, असे कंपनीने बुधवारी बाजारमंचांना कळवले.

आर्थिक वर्ष २०२६ च्या पहिल्या तिमाहीत, कंपनीच्या आयटी सेवा व्यवसायातून मिळणाऱ्या महसुलात १.५-३.५ टक्क्यांची घसरण होण्याची शक्यता आहे. आर्थिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांनी सावध भूमिका घेतली आहे

परदेशातून मिळणाऱ्या महसुलावर परिणाम होण्याची शक्यता आहे. मात्र सरलेल्या आर्थिक वर्षात कंपनीला दोन मोठे कार्यादेश प्राप्त झाले आहेत. अजूनही काही नवीन कार्यादेश मिळण्याची आशा आहे. कंपनीने कृत्रिम प्रज्ञा (एआय) क्षेत्रात स्थान अधिक मजबूत करण्यासाठी गुंतवणूक करणे सुरू ठेवले आहे, असे विप्रोचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक श्रीनी पलिया म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सध्या विप्रोमध्ये २,३३,३४६ कर्मचारी कार्यरत आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात वाढ झाली आहे. गेल्या वर्षी २,३२,६१४ कर्मचारी कार्यरत होते. बुधवारच्या सत्रात विप्रोचा समभाग १.४ टक्क्यांनी वधारून २४७.५० रुपयांवर स्थिरावला. सध्याच्या शेअरच्या बाजारभावानुसार कंपनीचे २,५९,३४६ कोटी रुपयांचे बाजारभांडवल आहे.