वृत्तसंस्था, नवी दिल्ली

सध्याच्या बाजारातील कल लक्षात घेता, वर्षाच्या उत्तरार्धातील सहामाहीत सोने सध्याच्या पातळीपेक्षा शून्य ते जास्तीत जास्त ५ टक्क्यांची मूल्य वाढ दर्शवू शकतो, असा जागतिक सुवर्ण परिषदेच्या (डब्ल्यूजीसी) गुरुवारी प्रसिद्ध झालेल्या अहवालाने अंदाज वर्तविला. २०२५ मध्ये आतापर्यंत २६ टक्क्यांच्या वाढीसह, सोन्याने रोखे, समभाग आणि इतर अनेक प्रमुख मालमत्तांपेक्षा चांगली कामगिरी केली आहे.

जागतिक अर्थव्यवस्थेची वाढ ही दुसऱ्या सहामाहीत नरमलेलीच राहण्याचा अंदाज आहे. याव्यतिरिक्त, जागतिक आयात करातील वाढीच्या प्रभावामुळे जागतिक चलनवाढ देखील ५ टक्क्यांहून अधिक राहण्याची शक्यता दिसून येते. या परिणामी सध्याच्या पातळीपासून सोन्याच्या किमतीत ५ टक्क्यांपर्यंत वाढ झाल्यास, सोन्याच्या किमतीतील वार्षिक वाढ ही २५ ते ३० टक्क्यांच्या आसपास राहू शकेल, असा जागतिक सुवर्ण परिषदेच्या अहवालाचा कयास आहे.

एकंदरीत मिश्र आर्थिक वातावरणाला प्रतिसाद म्हणून, मध्यवर्ती बँका चौथ्या तिमाहीच्या अखेरीस सावधगिरीने व्याजदर कमी करण्यास सुरुवात करतील अशी अपेक्षा आहे. अमेरिकेची मध्यवर्ती बँक असलेली ‘फेड’ वर्षाच्या अखेरीस अर्धा टक्क्यांची दर कपात करण्याची अपेक्षा आहे. जागतिक सुवर्ण परिषदेच्या मते, ‘फेड’ने व्याजदरात कपात केली आणि अर्थव्यवस्थेवर अनिश्चिततेचे मळभ दाटलेले राहिल्यास, गुंतवणूकदारांकडून मागणी सुरू राहिल्याने सोन्याच्या किमतीत अनुमानापेक्षा अधिक वाढ होऊ शकते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तथापि, अहवालात असा इशाराही देण्यात आला आहे की, सोन्याच्या किमती वाढल्याने ग्राहकांच्या मागणीत घट होऊ शकते. ज्यामुळे सोन्याची तेजी कमकुवत होऊ शकते. २०२५ च्या पहिल्या सहामाहीत सोने सुमारे २६ टक्क्यांनी वाढले आहे, जे कमकुवत अमेरिकी डॉलर, जगभरात मध्यवर्ती बँकांची व्याजदर कपात आणि अत्यंत अनिश्चित भू-राजकीय तसेच भू-आर्थिक वातावरण यासारख्या घटकांच्या एकत्रित प्रभावामुळे घडले आहे. यापैकी किमतीवर प्रभाव टाकणारे काही घटक पुढेही कायम राहण्याची अपेक्षा असली तरी, सोन्याच्या तेजीचा आगामी मार्ग हा व्यापार तणाव, चलनवाढीची गतिशीलता आणि पतविषयक धोरण यासह अनेक घटकांवर अवलंबून आहे, असे अहवालाने नमूद केले आहे.