scorecardresearch

जगभरात २०२२ मध्ये १.२ कोटी ‘ईव्हीं’ची विक्री

सरलेल्या वर्षात जागतिक पातळीवर पर्यावरणपूरक विद्युत शक्तीवर चालणारी १.२ कोटींहून अधिक वाहने विकली गेली.

Worldwide sales EV
जगभरात २०२२ मध्ये १.२ कोटी ‘ईव्हीं’ची विक्री (image – indian express/representational)

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

सरलेल्या वर्षात जागतिक पातळीवर पर्यावरणपूरक विद्युत शक्तीवर चालणारी १.२ कोटींहून अधिक वाहने विकली गेली. तर विद्यमान वर्षाअखेर (२०२३) विद्युत वाहनांची विक्री १.७ कोटींवर पोहोचण्याची आशा आहे, असे एका संशोधन अहवालातून पुढे आले आहे.

पर्यावरणपूरक विद्युत शक्तीवर चालणाऱ्या वाहनांच्या (ईव्ही) निर्मितीमध्ये अग्रेसर असणाऱ्या टेस्ला या कंपनीचे ‘वाय’ या वाहनाची जागतिक पातळीवर सर्वाधिक विक्री झाली आहे. त्यानंतर चीनमधील बीआयडी साँग या वाहनाची विक्री झाली आहे. २०२२ मध्ये, चीन, जर्मनी आणि अमेरिका हे ई-वाहनांसाठी सर्वात मोठ्या बाजारपेठ ठरल्या. जागतिक पातळीवर ई-वाहनांची निर्मिती करणाऱ्या दहा प्रमुख कंपन्यांची ३९ हून अधिक प्रकारची वाहने विक्रीसाठी उपलब्ध आहेत. त्यांचे बाजारातील योगदान ७२ टक्क्यांहून अधिक राहिले आहे.

हेही वाचा – अदानी समूहाकडून ७,३४७ कोटींच्या कर्जाची मुदतीपूर्व परतफेड

चीनमध्ये नव्याने करोनाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये चीनमधील उत्पादन आणि विक्री प्रभावित झाली. शिवाय यामुळे पुन्हा एकदा पुरवठा साखळी विस्कळीत झाली,असे संशोधन विश्लेषक अभिक मुखर्जी यांनी सांगितले. चीनमधील ई-वाहन कंपन्यांनी युरोप, आग्नेय आशिया आणि लॅटिन अमेरिकासारख्या बाजारपेठांमध्ये विस्तार करण्यास सुरुवात केली आहे.

हेही वाचा – ‘हिंदू विकास दरा’च्या रघुराम राजन यांच्या टिप्पणीवरून वादंग

मारुती सुझुकीचा बाजार हिस्सा घटला

मारुती सुझुकी इंडिया आणि ह्युंदाई मोटर इंडियाचा फेब्रुवारीमध्ये बाजारातील हिस्सा कमी झाला, तर टाटा मोटर्स, महिंद्रा आणि किया इंडियाने वार्षिक आधारावर वाढ नोंदवली. फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डिलर्स असोसिएशन अर्थात ‘फाडा’ने दिलेल्या माहितीनुसार, मारुती सुझुकीच्या प्रवासी वाहनांच्या विक्रीत घट झाली आहे. फेब्रुवारीमध्ये मारुतीचा बाजार हिस्सा घसरून ४१.४० टक्क्यांवर आला आहे, जो मागील वर्षी याच काळात ४२.३६ टक्क्यांवर होता. त्याचप्रमाणे, ह्युंदाई मोटर इंडियाचा बाजार हिस्सा फेब्रुवारी २०२२ मध्ये १४.९५ टक्क्यांच्या तुलनेत गेल्या महिन्यात १३.६२ टक्क्यांवर घसरला. टाटा मोटर्सचा बाजार हिस्सा फेब्रुवारी २०२२ मध्ये १३.१६ टक्के होता. तो गेल्या महिन्यात १३.५७ टक्क्यांवर पोहोचला. त्याचप्रमाणे, महिंद्र अँड महिंद्रचा बाजार हिस्सा फेब्रुवारी २०२२ मधील ७.०६ टक्क्यांवरून गेल्या महिन्यात १०.२२ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. तर किआ इंडियाचा बाजार हिस्सा मागील वर्षीच्या कालावधीत ५.२७ टक्क्यांवरून ६.८१ टक्क्यांवर पोहोचला आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त ( Finance ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-03-2023 at 10:11 IST
ताज्या बातम्या