गेल्या दोन-तीन दशकांत आर्थिक आघाडीवर चांगली कामगिरी करणाऱ्या देशांशी स्पर्धा करण्यासाठी भारताला आपली कार्यसंस्कृती बदलावी लागेल. यासाठी तरुणांनी कामात जास्त वेळ घालवला पाहिजे, असे इन्फोसिसचे सहसंस्थापक एन आर नारायण मूर्ती यांचे म्हणणे आहे. त्यांच्या मते भारतात कार्य करणाऱ्यांची उत्पादकता जगात सर्वात कमी आहे. ती वाढवण्यासाठी देशातील तरुणांनी दर आठवड्याला ७० तास काम करावे, असा सल्लासुद्धा त्यांनी देऊन टाकला आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर जपान आणि जर्मनीने हे काम करून विकासाची शिखरं पादाक्रांत केली आहेत.

थ्री वन फोर कॅपिटलच्या पॉडकास्ट ‘द रेकॉर्ड’मध्ये इन्फोसिसचे माजी CFO मोहनदास पै यांच्याशी नारायण मूर्ती यांनी बातचीत केलीय. तसेच राष्ट्र उभारणीपासून तंत्रज्ञान, आजची तरुणाई आणि त्यांची कंपनी इन्फोसिस अशा अनेक विषयांवर त्यांनी आपली मते मांडली. हे पॉडकास्टसुद्धा यूट्यूबवर रिलीज करण्यात आले आहे.

हेही वाचाः चांदीच्या दरानं ७२ हजार रुपये केले पार, सोन्याचे भावही वाढले, तुमच्या शहरात किंमत किती?

भारतात कार्याची उत्पादकता का कमी?

नारायण मूर्ती यांनी भारताच्या कमी कार्याच्या उत्पादकतेची कारणेही सांगितली. ते म्हणाले की, सरकारमधील भ्रष्टाचार आणि नोकरशाहीतील दिरंगाई ही कार्याची उत्पादकता कमी होण्याची प्रमुख कारणे आहेत. “भारताची कार्य उत्पादकता जगात सर्वात कमी आहे. जोपर्यंत आपण सरकारी पातळीवरील भ्रष्टाचार कमी करत नाही आणि नोकरशाहीतील दिरंगाईला आळा घालत नाही, तोपर्यंत ज्या देशांनी प्रचंड प्रगती केलीय, त्यांच्याशी स्पर्धा करणे आपल्यासाठी अवघड आहे.”

हेही वाचाः मुंबईतील हिरे उद्योगासह उर्वरित उद्योगही गुजरातला नेण्यासाठीच मोदी महाराष्ट्रात, नाना पटोलेंचा घणाघात

तरुणांनी पुढे येण्याची गरज

नारायण मूर्ती म्हणाले की, देशाची कार्य उत्पादकता वाढवण्यासाठी तरुणांना पुढे यावे लागेल. मी तरुणांना आवाहन करतो की, पुढे येऊन हा देश माझा आहे म्हणा. मला आठवड्यातून ७० तास काम करायला आवडेल. दुसऱ्या महायुद्धानंतर जपान आणि जर्मनीने हे केले होते, असे नारायण मूर्ती यांनी सांगितले. बर्‍याच वर्षांपासून दोन्ही देशांनी आणि त्यांच्या नागरिकांनी काही अतिरिक्त तास काम केले, असंही त्यांनी अधोरेखित केले. भारतात तरुणांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे देशाला प्रगतीच्या मार्गावर वेगाने पुढे नेण्याची जबाबदारीही तरुणांच्या खांद्यावर आहे. देशाची कार्यसंस्कृती बदलली पाहिजे. ते शिस्त, कठोर परिश्रम आणि दृढनिश्चयावर आधारित असले पाहिजे. तसे झाले नाही तर सरकार फार काही करू शकणार नाही, असंही ते म्हणालेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जसे लोक तसे सरकार

नारायण मूर्ती म्हणाले की, आपल्याला शिस्तबद्ध राहून कार्याची उत्पादकता वाढवायची आहे. आपण हे केल्याशिवाय सरकारही आमचे काही भले करू शकणार नाही. जशी लोकांची संस्कृती असेल, सरकारही तशीच असणार आहे. म्हणून आपण स्वतःला अत्यंत दृढनिश्चयी, शिस्तप्रिय आणि मेहनती लोकांमध्ये बदलले पाहिजे. बदलाची सुरुवात तरुणांपासून व्हायला हवी, असंही त्यांनी अधोरेखित केले.