Urjit Patel Appointed As Executive Director of IMF: भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर उर्जित पटेल यांची आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे (आयएमएफ) कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पटेल यांनी ४ सप्टेंबर २०१६ रोजी रिझर्व्ह बँकेचे २४ वे गव्हर्नर म्हणून पदभार स्वीकारला होता. पण, वैयक्तिक कारणांमुळे त्यांनी त्यांचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच पदाचा राजीनामा दिला होता.
“मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने अर्थतज्ज्ञ आणि आरबीआयचे माजी गव्हर्नर डॉ. उर्जित पटेल यांची आंतरराष्ट्रीय नाणेनिधी येथे कार्यकारी संचालक या पदावर तीन वर्षांच्या कालावधीसाठी नियुक्ती करण्यास मान्यता दिली आहे”, असे २८ ऑगस्ट रोजीच्या सरकारी अधिसूचनेत म्हटले आहे.
या नियुक्तीनंतर उर्जित पटेल आता IMF च्या कार्यकारी मंडळाच्या बैठकांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करतील. या मंडळात आयएमएफचे २४ कार्यकारी संचालक आहेत, जे संस्थेच्या दैनंदिन कामकाजावर लक्ष ठेवतात आणि महत्त्वाचे निर्णय घेतात. पटेल भारत, बांगलादेश, श्रीलंका आणि भूतानच्या गटाचे नेतृत्व करतील.
यापूर्वीही उर्जित पटेल यांनी आयएमएफमध्ये पाच वर्षे काम केले आहे. त्यांनी १९९२ मध्ये प्रथम वॉशिंग्टन डी.सी. आणि नंतर नवी दिल्ली येथे आयएमएफचे उपनिवासी प्रतिनिधी म्हणूनही काम केले होते.
आरबीआय गव्हर्नर होण्यापूर्वी, त्यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे उपनिवासी प्रतिनिधी म्हणूनही काम केले आहे. जिथे त्यांनी चलनविषयक धोरण आणि संशोधन यासारख्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या हाताळल्या. त्यांनी १९९८ ते २००१ पर्यंत अर्थ मंत्रालयात सल्लागार म्हणूनही काम केले. त्यांनी रिलायन्स इंडस्ट्रीज, आयडीएफसी लिमिटेड, एमसीएक्स लिमिटेड आणि गुजरात स्टेट पेट्रोलियम कॉर्पोरेशनसह सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रात इतर पदांवरही काम केले आहे.
२००० ते २००४ दरम्यान, पटेल यांनी अनेक उच्चस्तरीय राज्य आणि केंद्रीय समित्यांवर काम केले आहे. यामध्ये प्रत्यक्ष कर टास्क फोर्स, अर्थ मंत्रालय, संशोधन प्रकल्प आणि शेअर बाजार अभ्यास सल्लागार समिती, भारतीय स्पर्धा आयोग, पंतप्रधानांच्या पायाभूत सुविधा टास्क फोर्ससाठी सचिवालय, दूरसंचार मंत्र्यांचा गट आणि नागरी विमान वाहतूक सुधारणा समिती इत्यादींचा समावेश आहे. पटेल यांनी भारतीय मॅक्रो अर्थव्यवस्थेवर अनेक तांत्रिक प्रकाशने, कागदपत्रे आणि भाष्ये देखील लिहिली आहेत.
उर्जित पटेल यांनी येल विद्यापीठातून अर्थशास्त्रात पीएचडी, ऑक्सफर्ड विद्यापीठातून एम.फिल आणि लंडन विद्यापीठातून बी.एससी. केले आहे.