Will TikTok Return to start In India: भारतात टिकटॉक अनब्लॉक झाल्याची बातमी पूर्णपणे खोटी असून, शुक्रवारी संध्याकाळी सरकारी सूत्रांनी स्पष्ट केले की केंद्र सरकारने चीनच्या व्हिडिओ प्लॅटफॉर्म टिकटॉकला अनब्लॉक करण्याचा कोणताही आदेश जारी केलेला नाही. काल अनेक युजर्सनी असा दावा केला होता की, ते चीनच्या व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म टिकटॉकची वेबसाइट अ‍ॅक्सेस करू शकत होते. त्यानंतर सरकारने टिकटॉकवरील बंदी उठवण्याच्या वृत्ताचे खंडन केले.

सरकारचे स्पष्टीकरण

यावर प्रतिक्रिया देताना सरकारी सूत्रांनी स्पष्ट केले की, “भारत सरकारने टिकटॉक अनब्लॉक करण्याचा कोणताही आदेश दिलेला नाही. याप्रकारची विधाने किंवा बातम्या खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या आहेत.”

भारतातील अनेक युजर्सनी त्यांना टिकटॉकच्या वेबसाइटवर प्रवेश मिळत असल्याचे दावे केल्यानंतर सरकारकडून हे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. याचबरोबर तसेच, व्हिडिओ-स्ट्रीमिंग अ‍ॅप टिकटॉकचे मोबाइल अ‍ॅप्लिकेशन अद्याप गुगल प्ले स्टोअर आणि अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअरवर उपलब्ध नाही.

५९ चिनी अ‍ॅप्सवर बंदी

२०२० मध्ये, गलवाल व्हॅलीमधील तणावानंतर, देशाच्या अखंडतेला आणि सुरक्षेला धोका असल्याने भारताने सुमारे ५९ चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातली होती. या अ‍ॅप्समध्ये टिकटॉक, वीचॅट आणि हेलो सारख्या अनेक चिनी सोशल मीडिया अ‍ॅप्सचा समावेश होता.

२९ जून २०२० च्या आदेशानुसार बंदी घालण्यात आलेल्या बहुतेक अ‍ॅप्सना गुप्तचर संस्थांनी लाल झेंडा दाखवला होता. गुप्तचर संस्थांना संशय होता की हे, अ‍ॅप्स युजर्सचा डेटा गोळा करत होते आणि कदाचित ते देशाबाहेर पाठवत होते.

सरकारने आधीच स्पष्ट केले होते की हे अ‍ॅप्स भारताच्या सार्वभौमत्व आणि अखंडतेला, भारताच्या संरक्षणाला, राज्याच्या सुरक्षेला आणि सार्वजनिक सुव्यवस्थेला हानिकारक असलेल्या क्रियाकलापांमध्ये सहभागी आहेत. या कारणास्तव, टिकटॉकसह इतर अनेक चिनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्यात आली होती.

भारच-चीन संबंधांमध्ये सुधारणा

दरम्यान, अलिकडच्या काळात, दोन्ही देशांनी भारत-चीन संबंध सुधारण्यासाठी काही सकारात्मक पावले उचलली आहेत. या अंतर्गत, सीमा व्यापार पुन्हा सुरू करण्यात आला आहे जो लिपुलेख पास, शिपकी ला पास आणि नाथू ला पास या तीन निश्चित व्यापार मार्गांमधून चालेल.

दोन्ही देशांनी चीन आणि भारत यांच्यातील थेट विमान वाहतूक शक्य तितक्या लवकर सुरू करण्यास आणि अद्ययावत हवाई सेवा कराराला अंतिम रूप देण्यास सहमती दर्शविली आहे.