Operation Sindoor: गेल्या काही वर्षांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर किंवा अगदी देशांतर्गत पातळीवरदेखील एखादी सामाजिक वा राजकीय बाबींवर परिणाम करणारी घटना घडताच त्याचे पडसाद मुंबई शेअर बाजारावर दिसून येतात. Sensex किंवा Nifty50 वधारले तर त्याचा गुंतवणूकदारांना आनंदच होतो. पण घटना नकारात्मक असेल, तर त्याचे शेअर बाजारावरील परिणामही बहुधा नकारात्मकच असतात. यंदा मात्र चित्र काहीसं वेगळं आहे. भारत-पाकिस्तान सीमेवर गेल्या १५ दिवसांपासून सातत्याने गोळीबार, ड्रोन हल्ले आणि तणाव असूनही शेअर मार्केट मात्र बऱ्याच अंशी स्थिर असल्याचं दिसत आहे. यामागे नेमकं काय कारण आहे?
इंडियन एक्स्प्रेसनं सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर मुंबई शेअर बाजारात दिसणारे कल आणि त्यामागची कारणं यासंदर्भात सविस्तर वृत्त दिलं आहे. बुधवारी पहाटे भारतीय हवाई दलाने पाकव्याप्त काश्मीर व पाकिस्तानच्या हद्दीतील दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक केल्यानंतर पाकिस्तानकडूनही सीमेवर सातत्याने आगळीक करण्यात येत आहे. परिणामी जम्मू-काश्मीर, पंजाब, राजस्थान आणि गुजरात या राज्यांच्या सीमेकडील भागात मोठ्या प्रमाणावर तणाव निर्माण झाला आहे. भारतीय लष्कराकडूनही पाकिस्तानी लष्कराच्या कारवायांना सडेतोड उत्तर दिलं जात आहे.
सीमेवर तणाव, पण शेअर बाजार स्थिर
दरम्यान, सीमेवरील तणावानंतरदेखील शेअर बाजारात मोठी पडझड न होण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी कारणीभूत ठरल्याचं इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तात नमूद केलं आहे. यामागची सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे सीमेवरील तणावामध्ये भारत पाकिस्तानच्या वरचढ ठरला आहे. त्यामुळे संपूर्ण देशाप्रमाणेच शेअर बाजारातही सकारात्मक वातावरण कायम आहे.
आज सकाळी शेअर बाजार उघडला तेव्हा सेन्सेक्स ५४७ अंकांनी घसरून ७९,७८७.७६ अंकांवर स्थिरावला. हे प्रमाण ०.६८ टक्के इतकं होतं. दुसरीकडे निफ्टी १९२ अंकांनी घसरून २४,०८१.५० अंकांवर स्थिरावला.
शेअर बाजारात हे असं का घडतंय?
सामान्य परिस्थितीत असं काही घडलं असतं तर शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली असती. पण यावेळी ते न घडण्यामागे दोन कारणं आहेत. पहिलं तर आत्तापर्यंत जो काही तणाव सीमेवर निर्माण झाला आहे, त्यात भारताचाच वरचष्मा पाहायला मिळत आहे. दुसरं कारण म्हणजे जागतिक स्तरावर आर्थिक क्षेत्रात निर्माण झालेल्या परिस्थितीचा शेअर बाजारावर थेट परिणाम पाहायला मिळत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळे डॉलर काही प्रमाणात कमकुवत झाला असून अमेरिकन व चीनी अर्थव्यवस्थांना याचा काही अंशी फटका बसला आहे. त्यामुळे परिणामी भारतीय शेअर बाजाराला याचा फायदा झाल्याचं अर्थविषयक तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
गुंतणूकदारांनी घाबरून जाऊ नये
दरम्यान, सध्याची परिस्थिती अधिक चिघळल्यास किंवा तणाव अधिक काळ कायम राहिल्यास शेअर बाजारातील गुंतवणूकदारांनी घाबरून जाऊ नये, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. शेअर मार्केटमधली गुंतवणूक काढू नका, परिस्थितीवर लक्ष ठेवा आणि हा सगळा धुरळा शांत होण्याची वाट पाहा, असा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे.
“सध्याच्या परिस्थितीत आपण घाबरून जाण्यापेक्षा आगामी घडामोडींसाठी सज्ज राहणं कधीही श्रेयस्कर आहे”, असं एचडीएफसी सेक्युरिटीजच्या प्राईम रिसर्चचे प्रमुख देवर्ष वकील यांनी सांगितलं. जोपर्यंत हा तणाव किती काळ राहणार आहे, याचा नेमका अंदाज येत नाही, तोपर्यंत अल्पकाळातील घडामोडींवरून गुंतवणूकदारांनी निर्णय घेऊ नये, असं आवाहन अभ्यासकांकडून केलं जात आहे.