India-Russia Business: रशियाकडून खनिज तेल आयात करत असल्यामुळे अमेरिकेने भारतावर अतिरिक्त २५ टक्के आयातशुल्क लावण्याची घोषणा केली आहे. भारताने रशियाकडून आयात कमी करावी, असा ट्रम्प यांचा धोशा असला तरी भारताने मात्र रशियाशी असलेले व्यापार संबंध आणखी दृढ केले आहेत. बुधवारी भारत आणि रशिया यांच्यात दुर्मिळ खनिजे उत्सखननाबाबत महत्त्वाची चर्चा झाली.
चीनने सात महत्त्वाच्या दुर्मिळ खनिजांची निर्यात बंद केल्यामुळे भारतातील ऑटोमोबाइल क्षेत्रावर त्याचा विपरित परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर रशियाशी केलेली चर्चा महत्त्वपूर्ण ठरू शकते. दुर्मिळ खनिजांच्या जगाच्या एकूण मागणीपैकी एकट्या चीनकडून ८५ ते ९५ टक्के पुरवठा केला जातो. एकप्रकारे या क्षेत्रात चीनचा दबदबा आहे.
भारताच्या वाणिज्य आणि औद्योगिक मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, खनिज उत्खनन, भूगर्भातील कोळशाचे वायूकरण आणि आधुनिक औद्योगिक पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न भारत आणि रशिया या दोन्ही देशांकडून केला जात आहे. एरोस्पेस विज्ञान आणि तंत्रज्ञान या क्षेत्रावरही लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. याशिवाय आधुनिक विंड टनल फॅसिलिटी, लहान विमानाचे पिस्टन इंजिन निर्मिती, कार्बन फायबर तंत्रज्ञान विकसित करण्यात सहकार्य आणि ३डी प्रीटिंग अशा विविध औद्योगिक आघाड्यावर दोन्ही देश एकमेकांना सहकार्य करणार आहेत, असेही मंत्रालयाने म्हटले.
भारताच्या उद्योग संवर्धन आणि आंतरिक व्यापार विभागाचे (DPIIT) सचिव अमरदीप सिंग भाटिया आणि रशियाच्या औद्योगिक आणि व्यापार फेडरेशनचे उप मंत्री अलेक्सी ग्रुझदेव यांनी खाण उपकरणे, संशोधन आणि औद्योगिक आणि घरगुती कचऱ्याचे व्यवस्थापन आणि तंत्रज्ञान हस्तांतरणासह ॲल्युमिनियम, खते आणि रेल्वे वाहतूक यासारख्या प्रमुख क्षेत्रांवर चर्चा केली.
डोनाल्ड ट्रम्प यांनी काय म्हटले?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी जाहीर केले की, युक्रेनमधील रशियाच्या हल्ल्यामुळे उद्भवलेल्या राष्ट्रीय आणीबाणीला तोंड देण्यासाठी १ ऑगस्ट रोजी जाहीर केलेल्या २५ टक्के कराव्यतिरिक्त भारतीय मालावर आणखी २५ टक्के आयातशुल्क लावले जाईल.