Share Market Update Today : इस्रायल-इराण संघर्षात अमेरिकेने उडी घेतल्यामुळे मध्य-पूर्व आशियासह आता संपूर्ण जगभरात तणाव निर्माण झाला आहे. याचा सर्वात आधी तेलाच्या किमतीवर परिणाम झाला आहे. जागतिक बाजारपेठेत तेलाचे दर दोन टक्क्यांनी वाढून गेल्या पाच महिन्यांमधील उच्चांकावर पोहोचले आहेत. यामुळे आशियाई देशांमधील शेअर बाजार गडगडले आहेत. रविवारी पहाटे अमेरिकेने इराणच्या तीन प्रमुख अणू केंद्रांवर हवाई हल्ला केला होता. त्यावर आता तेहरान अमेरिकेला कसं प्रत्युत्तर देणार याकडे जगाचं लक्ष लागलं आहे.
रॉयटर्सने याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे की बाजारात सध्या भीतीमुळे विक्रीचं वातावरण नसून सुरुवातीच्या हालचाली नियंत्रणात आहेत. मात्र, तेलाच्या किमती २.८ टक्क्यांनी वाढल्या आहेत. दरम्यान, इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणारा जलमार्ग बंद करण्यासाठी हालचाली चालू केल्या आहेत. याबाबतचा अंतिम निर्णय त्यांची राष्ट्रीय सुरक्षा परिषद घेईल. तत्पूर्वी याचा तेलाच्या किमतींवर प्रभाव दिसू लागला आहे.
जगभरातील तेल व एलएनजी व्यापारावर मोठा परिणाम होण्याची शक्यता
जागतिक तेल व्यापाराचा सुमारे एक चतुर्थांश व द्रवीकृत नैसर्गिक वायू पुरवठ्याच्या २० टक्के भाग इराण व ओमानच्या नियंत्रणात असलेल्या या सामुद्रधुनीवर अवलंबून आहे. केवळ इराणचंच तेल या सामुद्रधुनीतून प्रवास करत नाही तर सौदी असब व यूएईसारखे पर्शियन आखाताच्या आसपासचे देश व इतर तेल उत्पादक देश त्यांची जहाजं खुल्या समुद्रात उतरवण्यासाठी ‘होर्मुझ’वर अवलंबून आहेत. या देशांमधून तेल आयात करणाऱ्या देशांकडे दुसरा कुठलाही सागरी मार्ग नसल्याने आणि इराणने सामुद्रधुनी रोखल्याने जगभरातील तेल व एलएनजी व्यापारावर मोठा परिणाम होईल.
युरोपातील देश, जपान हे मध्य-पूर्वेतील देशांमधून आयात होणाऱ्या तेलावर व एलएनजीवर अवलंबून आहेत. तर, अमेरिका मात्र तेलाचा निर्यातदार देश आहे. भारतही ८५ टक्के तेल आयात करतो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमती वाढल्या तर त्याचा भारतीय अर्थव्यवस्थेवर थेट परिणाम होतो.
भारतीय शेअर बाजार गडगडला
दरम्यान, मध्य पूर्वेतील तणाव व तेलाच्या किंमती वाढल्याचा भारतीय भांडवली बाजारावर परिणाम दिसू लागला आहे. भारतीय शेअर बाजार सकाळी उघडताच ०.९३ टक्क्यांनी गडगडला आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज ७६५ अंकांनी घसरून ८१,६४२ अंकांवर व्यवहार करत आहे. तर, निफ्टी १.०१ टक्क्याने म्हणजेच २५४.८० अंकांनी घसरून २४,८५७ अंकांवर व्यवहार करत आहे.